माणगाव येथील शिबिराचे उद्घाटन
माणगाव : रामप्रहर वृत्त
आजचे विद्यार्थी हे देशाचे उद्याचे भविष्य आहे आणि ते घडविण्यासाठी तुम्ही तयार व्हा, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 10) येथे केले. ते राष्ट्रीय सेवा योजना आणि नेतृत्व गुण व व्यक्तिमत्व विकास शिबिरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत होते.
पुणे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय आणि मुंबई विभाग राष्ट्रीय सेवा योजना व शिक्षण उपसंचालकयांच्या वतीने राज्यस्तरीय राष्ट्रीय सेवा योजना आणि मुंबई विभागस्तरीय नेतृत्व गुण व व्यक्तिमत्व विकास शिबिर माणगाव तालुक्यातील कुरवडे-वडघरमधील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक येथे 10 ते 12 जानेवारीदरम्यान होणार आहे. या शिबिराचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि पुणे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे कृष्णकुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाले.
या कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी डॉ. प्रशांतकुमार वनंजे, मुंबई विभागाचे शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे सहाय्यक संचालक शेषराव बडे, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षख संचालनालयाचे शिक्षण उपसंचालक संदीप संगवे, मुंबई विभागाचे विभागीय समन्वय विनोद गवारे, राजेंद्र कोळेकर, साहेबराव कासव, रामकिशन मोगल, संदीप जगदाळे, विशाल जाधव, मदन सुर्यवंशी, विभागीय समन्वयक विनोद गवारे आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास कशा प्रकारे करावा या संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांबद्दलची भावना मोठी असायला पाहिजे असा सल्ला देत साने गुरुजी स्मारक येथे हे शिबिर होत असल्याने या शिबिराने वेगळीच उंची गाठली आहे, असे प्रतिपादन केले. आजच्या युगात शास्त्र महत्त्वाचे आहे. त्यामुळे अभ्यासात जागतिक प्रगती करायची असेल तर विज्ञानाची कास धरणे महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले.
या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकासाठी तसेच या शिबिरासाठी दोन लाख 75 हजार रुपयांचा धनादेश दिला. त्यांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले.