Breaking News

पर्यटकांनी आततायीपणा टाळल्यास समुद्रकिनारे सुरक्षित

लाईफ जॅकेट ग्रामपंचायतीने पुरविण्याची मागणी

मुरूड ः संजय करडे

निसर्गसंन्नतेने नटलेली कोकण किनारपट्टी देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे, परंतु नवख्या ठिकाणी समुद्राचा अंदाज न घेता, तरूणाई पोहण्यासाठी खूपच अधीर होते. भरती-ओहोटीचे गणित लक्षात न घेतल्यास समुद्रात उडी घेणे जीवावर बेतू शकते. त्यामुळे ज्याप्रमाणे प्रशासनाने उपाययोजना करावी तशी पर्यटकांचीही जबाबदारी आहे. त्यांनीही आततायीपणा टाळला तरच समुद्रकिनारी सुरक्षित राहू शकतात. मुरूडच्या समुद्रावर 1991 साली सात कामगारांचा बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर जुलै 2014 रोजी चेंबूर येथील सहा व्यावसायिकांना पोहतांना जलसमाधी मिळाली. फेब्रुवारी 2016मध्ये आबिदा इनामदार कॉलेजच्या तब्बल 14 विद्यार्थ्यांना प्राण गमवावे लागल्याची घटना तर भयंकर होती. या दुर्घटनेनंतर शिक्षण उपसंचालकांना परिपत्रके काढून सहलींवर निर्बंध घालणे भाग पडले. काशिद ग्रामपंचायतीतर्फे बीचवर ठळकपणे खोल समुद्रात पोहणे धोकादायक आहे, असे फलक लावण्यात आले असले, तरी पोलिसांना गुंगारा देऊन बर्‍याचशा दुर्घटना घडल्याचे पुढे आल्या आहेत. बुडालेल्यांची संख्या आतापर्यंत 50पेक्षा जास्त आहे. नुकतीच 2023च्या सुरुवातीलाच औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील सानेगुरुजी विद्यालयातील इ. दहावीच्या दोन विद्यार्थ्यांना काशीद येथील समुद्रात जीव गमवावा लागला. काशीद समुद्रकिनारा मोठा असल्याने सर्वच ठिकाणी जीवरक्षक तैनात ठेवणे कठीण आहे, तरीसुद्धा काशीद ग्रामपंचायतीने उपाययोजना केल्या आहेत. काशीद येथील नुकत्याच घडलेल्या घटनेबाबत सामाजिक कार्यकर्ते वश्रीकांत सुर्वे यांनी पर्यटकांना लाईफ जॅकेट पुरविण्याची मागणी केली आहे. येणार्‍या पर्यटकांकडून काशीद ग्रामपंचायतीला आर्थिक फायदा मिळतो, तसेच स्थानिक हॉटेल व लॉजिंग व्यवसायिकांनासुद्धा नफा होत असतो. काशीद ग्रामपंचायतीने पर्यटकांची काळजी घेण्यासाठी समुद्रात पोहण्यासाठी जाणार्‍या प्रत्येक पर्यटकाला लाईफ जॅकेट देऊन त्यांच्या जीविताचे रक्षण करावे. यासाठी समुद्रात पोहण्यासाठी जाणार्‍या प्रत्येक पर्यटकांस लाईफ जॅकेटशिवाय पोहण्यास सक्त मनाई करावी व सर्व पर्यटकांना ग्रामपंचायतीने लाईफ जॅकेट पुरवावे, अशी मागणी सुर्वे यांनी केली आहे.

काशीद समुद्रकिनारी शेकडोंच्या संख्येने पर्यटक येत असतात. सर्वांना लाईफ जॅकेट पुरविणे ग्रामपंचायतीला शक्य नाही, ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती मजबूत नाही. सध्या तीन जीवरक्षक काशीद समुद्रकिनारी नियुक्त करण्यात आले आहेत, तसेच स्पीडबोटधारक पर्यटक बुडाल्यास मदतीला धावून येतात. समुद्रकिनारी ठिकठिकाणी सूचना फलक त्याचप्रमाणे भरती-ओहोटीच्या वेळासुद्धा फलकावर लिहिण्यात आलेल्या आहेत.

-सुशांत ठाकूर, ग्रामसेवक, काशीद ग्रामपंचायत

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेलमधील कानपोलीत विकासकामे

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत …

Leave a Reply