अलिबाग, नवी मुंबई ः प्रतिनिधी, बातमीदार
सातबारा उतार्यावर नोंद करण्यासाठी 10 हजार रुपये लाच मागणार्या पनवेल तालुक्यातील सुकापूर येथील तलाठ्याला नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ताब्यात घेतले आहे. संजय विष्णू पाटील (वय 55, रा. खांदा कॉलनी, पनवेल) असे या तलाठ्याचे नाव असून सध्या त्यांची अलिबाग तहसील कार्यालयात मंडळ अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे.
याबाबत 40 एका व्यक्तीने नवी मुंबई एसीबीकडे तक्रार केली होती. पथकाने पडताळणी केल्यानंतर तलाठी आणि सध्या मंडळ अधिकारी असलेल्या संजय पाटील यांच्यावर शुक्रवारी (दि.13) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. याबाबत सरकारतर्फे पोलीस निरीक्षक विद्युलता चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे.
तक्रारदार यांच्या राहत्या घराच्या सातबारा उतार्यावर मातोश्री को-ऑपरेटिव्ह सोसायटीची नाव नोंदणी करण्यासाठी तलाठी संजय पाटील यांनी 20 हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 10 हजार रुपये देण्याचे ठरले होते. याबाबत तक्रारदाराने नवी मुंबई एसीबीकडे तक्रार केली. पथकाने पडताळणी केली असता तलाठी पाटील यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच त्यांना सापळा रचून अलिबाग येथून ताब्यात घेण्यात आले.