Breaking News

नेरळच्या सार्वजनिक शिवजयंतीचे कार्य

गावाची शिवजयंती म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव तिथीप्रमाणे साजरा करणारी नेरळ येथील सार्वजनिक शिवजयंती. राज्यात प्रत्येक गावात रयतेचे राजे शिवाजी महाराज यांची जयंती तिथीप्रमाणे, मृत्यूच्या तारखेनुसार आणि काही भागात अक्षय्य तृतीया या दिवशी आपल्याकडे असलेल्या नियोजनाप्रमाणे साजरी करीत असतात. 1966 मध्ये नेरळ गावात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीप्रमाणे म्हणजे फाल्गुन वद्य तृतीया या दिवशी साजरी होण्यास सुरुवात झाली. या 53 वर्षाच्या काळात अनेक स्थित्यंतरे नेरळ गावात झाली, मात्र नेरळमध्ये सार्वजनिक स्वरूपात साजरी होणारी शिवजयंती मात्र अनादिकालापासून सुरू आहे त्यात खंड पडला नाही. अशा या नेरळ सार्वजनिक उत्सव समितीच्या माध्यमातून साजरी होत असलेल्या महोत्सवातून शिवाजी महाराज यांचे स्मारक नेरळ गावात उभे राहिले आहे, त्याच्या उभारणीच्या निमित्ताने घेतलेला आढावा…

छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेला विकटगड नेरळ गावाच्या समोर पश्चिम दिशेला उभा आहे.त्यामुळे महाराजांचे कार्य हे नेरळच्या ग्रामस्थांना अवगत करून देण्याची गरज नव्हती. 1966 मध्ये नुकतेच राजकीय धडा गिरविण्यास सुरुवात केलेल्या नेरळ गावातील तरुणांनी एकत्र येत शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्याचा निर्धार केला. त्या वर्षी सुरुवात झालेली नेरळ गावाची शिवजयंती आजही अविरतपणे 53 वर्षे सुरू आहे.दरवर्षी प्रत्येक गावात महाराजांची जयंती साजरी केली जाते, मात्र नेरळमध्ये उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी 1984 मध्ये माथेरान रस्त्यावर असलेल्या चौकाला शिवाजी चौक असे नाव दिले. एका लोखंडी पत्र्याचा एक फूट व्यासाच्या वर्तुळाकार पत्र्यावर शिवाजी चौक असे दोन शब्द लिहिले होते आणि तो फलक उभा केला गेला होता. ज्या ठिकाणी शिवाजी चौक असे नाव चौकाला देण्यात आले, त्यामुळे काही मीटरवर असलेल्या मुस्लीम मशिदीसमोर शिवाजी राजे यांच्या नावे चौक ही त्या वेळी काहीशी वेगळी वाटणारी संकल्पना शिवजयंती उत्सव समितीने प्रत्यक्षात आणली होती. त्यानिमित्ताने नेरळमध्ये शिवाजी चौक निर्माण झाला आणि 1995 मध्ये शिवसेनेचे पहिले सरपंच ग्रामपंचायतीमध्ये सत्तेत बसल्यावर तेथे एक चौथरा बांधून त्यावर भगव्या रंगात शिवाजी चौक लिहिले गेले. असा प्रवास सुरू असताना पुढे त्या ठिकाणी भव्य स्वरूपात शिवाजी महाराज यांचे स्मारक उभे राहील असे कोणालाही वाटले नव्हते, मात्र निश्चित ध्येय घेऊन काम केल्याने सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती मोठे काम भावी पिढीसाठी करू शकली आहे.

1996 मध्ये चौथरा तयार झाल्यावर पुढे काही वर्षानी तेथे शिवजयंती उत्सव समितीने शिवाजी महाराज यांची तसबीर चौकात उभी केली आणि त्या तसबिरीला हार घातले जाऊ लागले. उन्हा-पावसात उभी असलेली लाकडी फ्रेम आणि काचेची तसबीर मागील काही वर्षात तरुण कार्यकर्त्यांनी उत्सव समितीमध्ये सहभाग घेऊन दाखविली आणि शिवाजी चौकाचे छत्रपती शिवाजी महाराज चौकाबरोबर तेथे महाराजांचा पुतळा बसवून नवे रूप देण्यात आले. सिंहासनावर बसलेले प्रसन्न मुद्रेचे शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात आल्यानंतर उत्सव समितीमधील तरुणांनी मग दर रविवारी आरती सुरू केली. सायंकाळी होणारी शिवाजी महाराज यांची आरती ही शेजारी असलेल्या मुस्लीम मशिदीमुळे पुन्हा चर्चेत आली. कारण काही लोकांनी महाआरती आणि नमाज यांची सांगड घालून तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. रायगड जिल्हाधिकारी आणि रायगड पोलीस यांच्याकडे त्या अर्जांवर चर्चा होत होती, मात्र या काळात आलेली शिवजयंती आणि निघालेली मिरवणूक यात सहभागी तरुणांनी नंग्या तलवारी नाचवल्या, पण त्यातून सामंजस्यपूर्ण मार्ग काढत जातीय सलोखा राखण्याचे काम नेरळमध्ये झाले. या वर्षी शिवाजी महाराज जयंतीला असंख्य मुस्लीम धर्मीय मशिदीबाहेर उभे राहून मिरवणुकीचे स्वागत करीत होते.

मात्र नेरळ शिवजयंती उत्सव समितीने केलेल्या प्रयत्न आणि उभे राहिलेले शिवस्मारक यामुळे नेरळच्या वैभवात भर पडली आहे. कारण 2016 मध्ये नेरळ गावातील रस्त्यांचे रुंदीकरण करण्यास सुरुवात झाली, तेव्हा रस्त्याला शिवाजी महाराज चौक अडथळा ठरत होता. त्यामुळे प्रथम रस्त्याचे काम करणार्‍या ठेकेदाराने चौक नव्याने बांधून देण्याची तयारी दर्शविली होती. त्यानुसार काम देखील सुरू झाले होते, मात्र ठेकेदाराने नेरळ स्टेशन-माथेरान नाका असा रस्ता तयार केल्यानंतर शिवाजी महाराज चौकाचे नुतनीकरण थांबले. याच काळात नेरळ ग्रामपंचायतने शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यास जानेवारी महिन्यात सुरुवात केली आणि काही वर्षे रेंगाळलेल्या शिवाजी महाराज चौकाचे नुतनीकरण पूर्ण झाले, मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या पदाधिकारी यांनी विधिवत पूजाअर्चा करून शिवाजी महाराज यांच्या स्मारकात नवीन पुतळा स्थापित केला. नेरळ ग्रामपंचायतने रस्त्याचे काम ठेकेदार पूर्ण करणार नाही हे लक्षात येताच घाई घाईने, परंतु तिथीप्रमाणे येणार्‍या शिवाजी महाराज जयंती आधी भव्य असे स्मारक उभे केले. वर्षभर या स्मारकाची देखभाल राखण्याचे काम नेरळ ग्रामपंचायत करीत असते, त्याच वेळी रविवारी तरुणदेखील आरती करीत असतात, मात्र शिवजयंती उत्सव समितीच्या पुढाकाराने निर्माण झालेला चौक आणि त्यातून सर्वांना अपेक्षित असलेले स्मारक उभे राहिले असल्याने हिंदू धर्माबरोबर मुस्लीम धर्मीय नेते देखील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालायला पुढे आल्याचे चित्र नेरळकरांनी पाहिले.

53 वर्षाच्या काळात अनेक मान्यवरांनी शिवाजी महाराज यांची सार्वजनिक शिवजयंती उत्सवाचे अध्यक्ष होऊन आपल्या परीने कार्यक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. त्यातील अनेक शिवप्रेमी आज काळाच्या पडद्याआड गेले आहेत, मात्र जुन्या पिढीने हाती घेतलेले कार्य नवीन पिढी पुढे नेत असताना 23 मार्च रोजी अनेक माजी अध्यक्षांनी नव्याने बनलेले शिवाजी महाराज चौक आणि स्मारक डोळे भरून पाहिले. याचा अनुभव नेरळ ग्रामस्थांनी घेतला. त्यात राजेंद्र यादव, गजानन डबरे, विश्वनाथ जामघरे, भाऊ क्षीरसागर, कमलाकर जामघरे, अजित सावंत, प्रशांत नाचण, मिलिंद मिसाळ, अरुण कराळे, सुधाकर देसाई, कै. रवींद्र शिंदे, सुहास देसाई, सुनील साटम, मनोज मानकामे, निनाद साळुंखे, विजय पवार, बंडू क्षीरसागर, किसन शिंदे, मिलिंद परभणे, नितीन परिट, प्रमोद साटम या जुन्याबरोबर प्रथमेश मोरे, मंगेश म्हसकर, सुरेश टोकरे यांनी ही पताका कायम ठेवून सार्वजनिक शिवजयंती सोहळा हा नेरळकरांच्या कायम स्मरणात राहील असे काम आशिष नाईक यांच्यानंतर या वर्षी संतोष शेळके यांनी सार्वजनिक उत्सवाची यशस्वी कारकीर्द घडविण्यात महत्त्वाची भूमिका ठरली.

-संतोष पेरणे, खबरबात

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply