Breaking News

महारोजगार मेळाव्यातून तरुणांना रोजगार

प्रकल्पग्रस्तांचे नेते स्व. दि. बा. पाटील यांच्या जयंतीनिमित्त उपक्रम

पनवेल ः रामप्रहर वृत्त

भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या जयंतीनिमित्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय मुंबई विभाग आणि लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती यांच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा शुक्रवारी (दि. 13) आगरी समाज मंडळाच्या पनवेल शहरातील सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे उद्घाटन कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील आणि उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. या महारोजगार मेळाव्यामुळे अनेक तरुणांना रोजगार मिळाला आहे.

महारोजगार मेळाव्यास प्रमुख मान्यवर म्हणून कृती समितीचे कार्याध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेविका दर्शना भोईर, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, स्व. दि. बा. पाटील यांचे पुत्र अतुल पाटील, नवी मुंबई अध्यक्ष दीपक पाटील, उपायुक्त पवार, गावडे तसेच विनोद म्हात्रे, राजेंद्र पाटील, जे. डी. तांडेल, कृष्णकुमार भारती, गुलाब वझे, जयेश घरत, मधुकर भोईर यांच्यासह विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या मेळाव्यात नामांकित उद्योग आणि कंपन्यांमध्ये नोकरीची संधी तसेच कौशल्य विभागाच्या माध्यामतून प्रशिक्षण, अप्रेंटिसशिप रोजगारासाठी नोंदणी, स्वयंरोजगार मार्गदर्शन व विविध कर्ज योजनांची माहिती देण्यात आली. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत जास्तीत जास्त युवक-युवतींना रोजगार देण्याचे आवाहन केले. मेळाव्याचा ठाणे, रायगड आणि नवी मुंबईतील रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या युवक-युवतींनी लाभ घेतला. या मेळाव्यामुळे अनेक तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली. म्हणून त्यांनी आयोजकांचे आभार मानले.

Check Also

स्वप्नपूर्ती!

भारताने ट्वेंटी-20 विश्वचषक जिंकून आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या स्पर्धांमधील विजेतेपदाचा दुष्काळ अखेर संपवला. रोहित …

Leave a Reply