पालीमध्ये जत्रा भरली : 300 दुकाने थाटली; करोडोंची उलाढाल
पाली : प्रतिनिधी
आयएसओ मानांकन प्राप्त व महाराष्ट्रातील प्रख्यात धार्मिक स्थळ असलेल्या पालीतील श्री बल्लाळ विनायकाचा माघ मासोत्सव (दि.22) ते (दि.26) पर्यंत साजरा होत आहे. मासोत्सवासाठी पाली नगरी सजली असून सर्वत्र भक्तिमय वातावरण पहायला मिळत आहे. यानिमित्त पालीत मोठी जत्रा सुद्धा भरली आहे. विविध राजकीय पक्षाचे पुढारी व नेतेगण यांचे माघी उत्सवाच्या शुभेच्छा बॅनर थाटले आहेत. भाविकांना सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टने उपाययोजना केल्या आहेत. याबाबत नियोजन बैठक पाली तहसील कार्यालयात तहसीलदार उत्तम कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. तहसीलदार यांनी सर्व प्रशासकीय अधिकार्यांकडून तसेच बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्याकडून नियोजनाची माहिती घेवून मार्गदर्शक सूचना केल्या. यावेळी पोलीस प्रशासन चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी दिली. राज्य परिवहन मंडळाकडून अतिरिक्त गाड्यांची सोय करण्यात आली असून त्याचे आरक्षण करण्यासाठी पाली बसस्थानक तसेच मंदिर परिसरात देखील एक विशेष सोय केली आहे. मंदिर प्रशासन तसेच पाली नगरपंचायतकडून यात्रेकरूंच्या सोयीसाठी तसेच याकालावधीत स्वच्छता राहावी म्हणून नगरपंचायतीकडून पाणी आणि स्वच्छता, जागोजागी कचराकुंड्या याची व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शन मंडप, नवीन शौचालये देखील बांधण्यात आली आहेत. त्याचबरोबर रुग्णवाहिका, डॉक्टर, अग्निशमन वाहन, पाण्याचे टँकर, लाईट जनरेटर याची देखील सोय नियोजन बद्ध करण्यात आली असल्याचे देवस्थान चे अध्यक्ष जितेंद्र गद्रे यांनी सांगितले. वाहतूक कोंडी रोखाण्यासाठी उपयोजना करण्यात आली आहे. मोठ्या वाहनांची वाहतूक गावाबाहेर थांबविण्यात आली आहे. त्याबरोबर उंबरवाडी येथे तसेच वाकणच्या दिशेने धारिया यांच्या जागेत आणि झाप गावाकडे वाहनतळाची व्यवस्था असून तेथून भाविकांना आणण्यासाठी रिक्षांची मोफत सोय आहे. उत्सवात विविध प्रकारची 300 दुकाने थाटली आहेत.
मंदिरला विद्युत रोषणाई व सजावट
उत्सवानिमित्त मंदिर व मंदिर परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिर तलावा भोवती संतांच्या व इतर मुर्त्या व देखावे लावले आहेत. तिथेही अभिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. कारंजे देखील आहेत. रोंगोळी काढण्यात आली आहे. फुलांच्या हारांनी सजावट केली आहे. तसेच मंदिराच्या प्रवेशद्वारावर आकर्षक मोठी कमान बसवण्यात आली आहे.
मंदिर प्रशासनाने भाविकांच्या सोयीसाठी मोफत नाश्ता तसेच प्रसादाची सोय करण्यात आली असून त्याचा भाविकांनी लाभ घ्यावा. भाविकांना राहण्यासाठी दोन सुसज्ज भक्त निवास आहेत. वाहने पार्क करण्यासाठी देवस्थानची दोन भव्य पार्किंग देखील आहे. तेथे मोफत पार्किंगची व्यवस्था आहे. तसेच सुसज्ज स्वच्छता गृह देखिल आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणार्या भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होत नाही. पालखी मार्गाच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध केला आहे.
-जितेंद्र गद्रे, अध्यक्ष, बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट
रोह्यातील पुरातन मंदिरात माघी गणेश जयंती उत्साहात
रोहा : रोहा अष्टमी नामदेव शिंपी समाजाच्या 128 वर्षाच्या पुरातन आणि जागृत श्री गणपती मंदिरात माघी गणेश जयंती उत्सव मोठ्या भक्ती भावाने उत्साहात साजरा करण्यात आला. समाजाचे अध्यक्ष मकरंद प्रभाकर बारटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली श्रींच्या मूर्तीवर अभिषेक, पूजा, आरती किरण बारटक्के व रेवती बारटक्के या दाम्पत्याच्या शुभहस्ते विधिवत करण्यात आले. रवी पतंगे यांनी उत्कृष्ट पौरोहित्य केले. या मंगलदिनी सकाळी श्री गणेशाची सुमधुर भक्ती गीते, रंगीबेरंगी फुलांच्या माळा, सुबक रांगोळी, विद्युत रोषणाई करून मंदिर सुशोभित करण्यात आले होते.असंख्य भाविकांनी रांगेत उभे राहून श्रींचे दर्शन घेतले आणि मनोभावे प्रार्थना केली. शेकडो भक्तगणांनी महाप्रसाद घेतला समाजाचे अध्यक्ष मकरंद बारटक्के व त्यांचे पदाधिकारी सदस्य, महिला अध्यक्षा पूनम प्रमोद पाटुकले त्यांच्या पदाधिकारी व सदस्य, समाज बांधव आणि भगिनी यांनी उत्सव विषयी करण्यासाठी परिश्रम घेतले. दुपारी जय भवानी भजनी मंडळ वरवडे पाले यांचे सुश्राव्य कीर्तन झाले तर समाजाच्या बंधू भगिनी आणि मुलांनी सामुदायिक अथर्वशीर्ष केले दिवसभर श्रींच्या दर्शनासाठी भक्तगण येत होते. यावेळी तहसीलदार कविता जाधव, पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर, नायब तहसीलदार राजेश थोरे, विविध क्षेत्रातील मान्यवर श्री भक्तगणांनी मंदिरात येऊन मनोभावे दर्शन घेतले.
महड वरदविनायक जन्मोत्सवाला भाविकांची उसळली अलोट गर्दी
खोपोली : तालुक्यातील अष्टविनायकापैकी एक असलेल्या महड मंदिरात गणेश जन्मोत्सव सोहळा भाविकांच्या अफाट गर्दीत उत्साहात साजरा करण्यात आला. नवसाला पावणारा अशी ख्याती असलेला महड येथील वरदविनायक गणपती मंदिरात माघी गणेशोत्सव विविध धार्मिक ,सांस्कृतिक कार्यक्रमाने दरवर्षी साजरा केला जातो.जन्मोत्सव निमित्ताने कीर्तनाचे आयोजन मंदिरात केले होते. यावेळी मंदिरातील सभा मंडप भाविकांनी तुडुंब भरला होता. मंदिरा बाहेर देखील भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. कडधान्याच्या सहाय्याने जवळपास तीस फूट लांब आणि दहा फूट रुंदीची अतिशय सुंदर रांगोळी काढण्यात आली होती. याशिवाय मंदिराचा गाभारा आतून बाहेरून झेंडूच्या फुलाने सजवण्यात आला होता. झेंडूच्या फुलांमध्ये भारताचा नकाशा, भारत माता ,आणि गणपतीची प्रतिकृती आपटी खालापूर येथील दीपक नाना पाटील यांनी सुंदर साकारली होती.
भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी देवस्थान संस्थानकडून विशेष काळजी घेण्यात आली आहे. भाविकांना निर्वीघ्नपणे दर्शन घेता यावे यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे.
: अॅड. मोहिनी वैद्य- कार्याध्यक्ष देवस्थान संस्था महड