Breaking News

महाड आयटीआय इमारतीला दुरुस्तीची प्रतीक्षा

औद्योगिक शिक्षण देणार्‍या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) इमारतीची सध्या दुरवस्था झाली आहे. महापुरानंतर इमारतीच्या देखभाल दुरुस्तीला पुरेसा निधी उपलब्ध न झाल्याने आहे त्या परिस्थितीतच मुलांना शिक्षण घ्यावे लागत आहे. महाडमध्ये केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) हे केंद्र सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या केंद्रातून लाखो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेवून आपला रोजगाराचा प्रश्न सोडवला आहे. मोटार मेकॅनिक, फिटर, वेल्डर, अटेंडंट ऑपरेटर (केमिकल प्लांट), मेंटेनन्स मेकॅनिक (केमिकल प्लांट), इलेक्ट्रॉनिक्स, वायरमन आदी कोर्स या ठिकाणी उपलब्ध आहेत. एका कोर्सकरिता साधारण 30 त 40 विद्यार्थ्याना प्रतिवर्षी प्रवेश दिला जातो. महाड परिसरात आयटीआय प्रशिक्षण उपलब्ध नव्हते अशा काळात पोलादपूर, म्हसळा, रोहा, तळा, माणगाव आदी ठिकाणांहून विद्यार्थी महाडमध्ये प्रवेश घेत होते. आजही महाडमधील आयटीआयला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे प्रथम प्राधान्य असते, मात्र तत्कालीन शासनाच्या उदासीन धोरणामुळे महाडचा आयटीआय दुर्लक्षित होत चालला आहे. त्यातच सन 2021मधील महापुरानंतर महाड आयटीआयची पुरती वाट लागली आहे. नदीपासून जवळच असलेल्या आयटीआयचे या महापुरात मोठे नुकसान झाले. महाड आयटीआय परिसरात सुमारे 10 फुटांपर्यंत पुराचे पाणी शिरल्याने विद्युत उपकरणे, लेथ मशीन, विद्युत यंत्रणा, वाहने आणि इतर साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बहुतांश साधने विद्यार्थ्यांनी कौशल्य दाखवत दुरुस्त करून घेतली आहेत. हा एक त्यांच्या अभ्यासाचा भाग बनला गेला असल्याचे येथील शिक्षकांनी सांगितले. आयटीआयमधील साधनांबरोबर इमारतीचेदेखील नुकसान झाले आहे, मात्र किरकोळ दुरुस्ती वगळता इमारतीचे काम झालेले नाही. इमारतीसमोर असलेली सरंक्षक भिंत महापुरात कोसळून गेली आहे, तर आयटीआयच्या आवारात साचलेला चिखल, कचरा आजही तसाच आहे. नवीन यंत्रणा उपलब्ध न झाल्याने आहे त्याच यंत्रणेवर विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे. महाड आयटीआयमध्ये 600हून अधिक प्रशिक्षणार्थी प्रतीवर्षी प्रवेश घेत आहेत, मात्र इमारत आणि इतर कामासाठी आवश्यक पुरेसा निधी प्राप्त होत नाही. त्यातच अनेक पदेदेखील रिक्त आहेत. यामुळे उपलब्ध कर्मचारी आणि निदेशकांच्या सहाय्याने प्रशिक्षण देण्याचे काम केले जात आहे. महाड आयटीआय मोटार मेकॅनिक, फिटर, वेल्डर, अटेंडंट ऑपरेटर (केमिकल प्लांट), मेंटेनन्स मेकॅनिक (केमिकल प्लांट), इलेक्ट्रॉनिक्स, वायरमन, या विषयांवर दोन वर्षांचे प्रशिक्षण दिले जाते. सध्या महाड आयटीआयमध्ये सुधारित आकृतीबंधानुसार 50 पदांची आवश्यकता आहे, मात्र फक्त 16 पदेच भरलेली आहेत. जवळपास 36 पदे रिक्त असल्याने प्रशिक्षण देताना विद्यार्थ्यांना अडचण निर्माण होत आहे. शिल्प निदेशकांच्या 13 जागा रिक्त आहेत, तर लिपिकाच्यादेखील चार जागा रिक्त आहेत. चतुर्थ कर्मचारी वर्गाची आवश्यकता असताना याठिकाणी फक्त तीनच पदे भरलेली आहेत. यामुळे महाड आयटीआयमध्ये प्रवेश घेणार्‍यांची संख्या अधिक असली तरी अपुरा निधी आणि अपुरा कर्मचारी वर्ग ही समस्या याठिकाणी निर्माण झाली आहे. शासनाचे आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचे महाड आयटीआयकडे दुर्लक्ष झालेले आहे. पूर्ण कर्मचारी वर्ग इमारत निधी उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे मत येथील प्राचार्य शिंदे यांनी सांगितले. महाड औद्योगिक वसाहती व त्यामध्ये निर्माण होणार्‍या कुशल कामगार भरतीचा जर विचार केला, तर महाड आयटीआयमधून केवळ 250 ते 300 विद्यार्थी प्रशिक्षित होऊन बाहेर पडतात. त्यामुळे नाईलाजाने कंपन्यांना बाहेरील आयटीआयच्या उमेदवारांचा विचार करावा लागतो. महाड आयटीआयची जशी दुरुस्ती होणे गरजेचे आहे तसेच या ठिकणचे कोर्सेस वाढवून मुलांची अ‍ॅडमिशन संख्या वाढविली पाहिजे, तरच येथील स्थानिक गरजू विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

-महेश शिंदे

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply