Breaking News

कोकण शिक्षक मतदारसंघात रायगड जिल्ह्यामध्ये 93.56 टक्के मतदान

पनवेल : रामप्रहर वृत्त
राज्य विधान परिषदेच्या कोकण, औरंगाबाद व नागपूर शिक्षक, तर नाशिक व अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी (दि. 30) मतदान प्रक्रिया झाली. सर्व ठिकाणी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. कोकण शिक्षक मतदारसंघात रायगड जिल्ह्यामध्ये 93.56 टक्के मतदान झाले आहे.
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. ज्या शाळांना माध्यमिक शाळेचा दर्जा देण्यात आला आहे, अशा शाळांमधील मागील सहा वर्षांत किमान तीन वर्षे शिक्षक म्हणून काम केलेले शिक्षक या निवडणुकीत मतदान करण्यासाठी पात्र असतात. त्यानुसार पात्र असलेल्या शिक्षकांनी सोमवारी मतदान केले.
या निवडणुकीच्या रिंगणात आठ उमेदवार असले तरी प्रमुख लढत महायुतीचे ज्ञानेश्वर म्हात्रे आणि महाविकास आघाडीचे बाळाराम पाटील यांच्यात असून बदललेली राजकीय समीकरणे पाहता म्हात्रे सरांचा विजय निश्चित मानला जात आहे. कोकणसह पाचही मतदारसंघांतील निवडणुकीची मतमोजणी 2 फेब्रुवारीला सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार आहे.

शिक्षकांचे प्रश्न एक शिक्षकच प्रभावीपणे सोडवू शकतो. त्यामुळे कोकण शिक्षक मतदारसंघातून ज्ञानेश्वर म्हात्रे भरघोस मतांनी विजयी होतील.
-लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी खासदार

मी ज्या ज्या शाळेत प्रचारासाठी गेलो त्या शाळांमधील शिक्षकांचे मत हे एका शिक्षकाला म्हणजेच ज्ञानेश्वर म्हात्रे यांना मिळेल असा निर्धार शिक्षकांनी केला होता. त्यामुळे म्हात्रे सरांचा विजय निश्चित मानला जात आहे.
-आमदार प्रशांत ठाकूर, भाजप रायगड जिल्हाध्यक्ष

Check Also

पनवेल ग्रामीण भागातील रस्त्यांचा होणार विकास

50 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता; आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी व पाठपुराव्याला यश पनवेल …

Leave a Reply