Breaking News

मविआचा विकासकामांच्या श्रेयावरून वाद चव्हाट्यावर;

इंदापूर विभागात राष्ट्रवादी-उद्धव ठाकरे गट आमने सामने

माणगाव ः प्रतिनिधी
माणगाव तालुक्यातील इंदापूर विभागात विकासकामांच्या श्रेयावरून महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव गटाचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. याची जोरदार चर्चा माणगाव तालुक्यात सर्वत्र सुरू आहे. गेल्या तीन-चार महिन्यांपूर्वी अशा विविध कारणांमुळे शिवसेनेत गटबाजी होऊन शिवसेनेचा एक गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बाहेर पडला. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. यानंतर महाविकास आघाडी एकत्रित चांगल्या प्रकारे काम करेल असे वाटत असतानाच रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील इंदापूर विभागात विकासकामांच्या श्रेयावरून राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव गटाचा वाद चांगलाच चव्हाट्यावर आला आहे. इंदापूर विभागातील विविध विकासकामांचा शुभारंभ सोमवारी (दि. 3) आमदार आदिती तटकरे यांनी केला. त्यावेळी त्यांनी इंदापूर विभागातील निळज ग्रामपंचायत हद्दीतील व तळाशेत इंदापूर मधील कोल्हाण या गावातील जलजीवन मिशन योजनेतून मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजनांचा शुभारंभ केला. या पाणीपुरवठा योजना आपण मंजूर करून आणल्याचे शिवसेना उद्धवगटाचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांनी इंदापूर येथे मंगळवारी (दि. 4) पत्रकार परिषद घेऊन जाहीर करून आमदार आदिती तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली. त्यामुळे पुन्हा एकदा माणगाव तालुक्यातील इंदापूर विभागात महाविकास आघाडीचा वाद उफाळून आला आहे. सद्यपरिस्थितीत या विभागात शिवसेना शिंदे गट जोमाने कामाला लागले असून येणार्‍या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत शिवसेना शिंदेगट बाजी मारेल, अशी चर्चा तालुक्यात सर्वत्र सुरू आहे.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply