Breaking News

माणकीवलीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात

कारवाई करण्याची मागणी : खडी तयार करण्यासाठी लावताहेत सुरुंग

खालापूर : प्रतिनिधी

खालापूर तालुक्यातील ग्रुप ग्राम पंचायत माणकीवली हद्दीमध्ये खडी मशीन मोठ्या प्रमाणावर दगड उत्खनन करत असून या परिसरात सुरू असलेल्या खडी मशीनच्या धुळीमुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तर या पाच दगड खान, खडीमशीन असल्याने या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या खडी तयार करण्यासाठी डोंगराळ गावा जवळील जमिनीला सुरुंग लावण्याचे प्रकार होत आहेत. या ठिकाणी खडीचे उत्पादन करताना मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरत असून अनेकांना विविध आजार जडत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न ऐरणीवर आला आहे. संबंधित विभागाने या खडी मशीन मालकांवर नियंत्रण व नियम लावणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.  याबाबत संबंधित प्रशासन काय कारवाई करणार याकडे सार्‍यांचे लक्ष लागून राहिले आहे.खालापूर तालुक्यात माणकीवली ग्रामपंचायत अनेक कारणाने बहुचर्चित असून तालुक्यातील सर्वाधिक खडी मशीन या माणकीवली ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहे. या दगड खाणींमुळे धुळीचे साम्राज्य पसरल्याने परिसरातील नागरिक व लहान मुले धुळीमुळे त्रस्त झाले आहेत. या धुळीमुळे परिसरातील नागरिकांचा श्वास कोंडला जात आहे. हा भयंकर व जीवघेणा त्रास नागरीकांना सहन करावा लागत असून याकडे संबंधित प्रशासन मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची टीका या भागातील नागरीक करीत असल्याने तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.  खडी उत्पादन करणारे क्रशर हे कारखाने गावाला लागूनच आहेत. या ठिकाणी रस्ते, आरसीसी, बांधकामांसह आदी कामांना लागणारी खडी बनविली जाते. या ठिकाणी दगड उपलब्ध करण्यासाठी येथील डोंगराळ भागाला सुरुंग लावण्याचे प्रकार नेहमीच सुरू असल्याने यामुळे जमिनीला हादरे बसत आहेत. त्यामुळे या परिसरातील अनेक घरांना तडे जाणे, हादरा बसत असल्यामुळे घरातील भांडी पडणे, विद्युत उपकरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहचत आहे. या खाण उद्योगाच्या आसपास गावभाग, छोटी मोठी वस्ती आहे. सभोवताली डोंगरासारखा उंच भाग असल्यामुळे संपूर्ण परिसरात खडी मशीनमुळे होणारी धूळ पसरल्याचे चित्र दिसून येते. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून अधून-मधून सुटणार्‍या वार्‍याच्या वेगाने धूळ परिसरात पसरली जात आहे. त्यामुळे परिसरातील अनेकांना दमा, शिंका येणे, स्कीन अ‍ॅलर्जी, डोक्याचे केस गळणे, फुफ्फुसाचा विकार, डोळ्याची जळजळ, डोळे दुखी तर क्रशरच्या सतत धडधडणार्‍या आवाजामुळे अनेकाना हृदयविकार जडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. लहान मुलेही यातून सुटलेली नाहीत, तेही अशा धुळीच्या आजाराचे शिकार बनत चालले असल्याचे प्रतिक्रिया नागरीक व्यक्त करीत आहेत. याबाबत संबंधित प्रशासन क्रशर मालकांवर कारवाई करते का? याकडे सार्‍यांचे लक्ष लागून राहिले आहे.

घटनेचे कोणालाही सोयरसूतक नाही!

खडीचे उत्पादन करत असताना या परिसरात धुळीचे साम्राज्य पसरत असून येथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे या परिसरात साधनसंपत्ती नष्ट झाली काय किंवा राहिली काय, याचे कोणालाही सोयरसुतक नसल्याचे वास्तव्याचे चित्र सध्या या ठिकाणी दिसून येत आहे.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply