मुरुड : प्रतिनिधी
मुंबई मुरुड या मुख्य रस्त्याला जोडणारा वीहूर पूल अत्यंत महत्वाचा असताना सुधा केवळ दोनशे मीटर रस्त्याला कार्पेट टाकण्याचा विसर बांधकाम खात्यास पडल्याने आज असंख्य प्रवासी यांना धूळ व खाच खळग्यातून प्रवास करावा लागत आहे. सन 2021 च्या मुसळधार पावसामुळे विहूर् पुलाच्या दोन्ही बाजूचे संरक्षक कठडे वाहून जाऊन येथे मोठ मोठे खड्डे पडले होते. स्थानिक पत्रकार यांनी पाठपुरावा केल्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूच्या संरक्षक भिंत काँक्रीटच्या बांधण्यासाठी लाखो रुपयांचा निधी प्राप्त झाला. निधी प्राप्त होऊन वर्ष झाले असताना देखील संबंधित ठेकेदार काम सुरू करीत नव्हता यावर खूप गदारोळ झाल्यावर ठेकेदाराने हे काम सुरू केले.सध्या वीहूर् पुलाच्या दोन्ही बाजूकडील संरक्षक भिंत बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे. आता संरक्षक लोखंडी पाईप बसवण्याचे काम शिल्लक आहे. मागील दोन वर्षापासून हे काम प्रलंबित राहिल्याने या पुलाच्या आजूबाजूकडील किमान दोनशे मीटरचा परिसर हा खड्डेमय झाला आहे. या पुलाकडील सर्व बाजूने डांबरी कार्पेट मारणे खूप आवश्यक आहे. परंतु याकडे दुर्लक्ष झाल्याने असंख्य प्रवाशांना धूळ व खाचखळग्यातून प्रवास करावा लागत आहे. किमान दोनशे मीटरचे तरी कार्पेट डांबरीकरण करून असंख्य प्रवाशी यांना दिलासा द्यावा अशी मागणी बांधकाम खात्याकडे होत आहे. मे अखेर पर्यंत कार्पेट न केल्यास पावसाळ्यात या पुलाजवळ मोठ मोठे खड्डे होऊन प्रवासी लोकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. तेव्हा बांधकाम खात्याने लवकरात लवर कार्पेट करावे अशी मागणी प्रवासी करीत आहेत.