Breaking News

ठाकरे-वायकर कुटूंबीयांच्या 19 बंगल्यांची नोंद रद्द केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

अलिबाग : प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वायकर कुटुंंबीयांच्या नावावर मुरूड तालुक्यातील कोर्लई येथील 19 बंगल्यांच्या घोटाळा प्रकरणात सहा जणांविरोधात रेवंदडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बनावट कागदपत्र तयार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कोर्लई ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक, सरपंच यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल झाला आहे.
कोर्लई येथील जागेतील 19 बंगल्यांची नोंद रद्द केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली होती. याबाबतची तक्रार मुरूडच्या ग्रामविकास अधिकारी संगीता भांगरे यांनी नोंदविली. त्यानुसार ग्रामसेवक देवंगणा वेटकोळी, विनोद मिंडे, वेदिका म्हात्रे, सरपंच गोविंद चंदर वाघमारे, रेश्मा रमेश मिसाळ, रिमा रमेश पिटकर आणि प्रशांत जानू मिसाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2014 साली उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आमदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांनी कै. अन्वय नाईक यांच्याकडून कोर्लई येथील जागा त्यावरील बांधकांमासह विकत घेतली होती. या जागेवर 19 बंगले असल्याची नोंद ग्रामपंचायत कार्यालयात होती. कै. अन्वय नाईक या घरांची घरपट्टी भरत होते. हे बंगले ठाकरे-वायकर यांच्या नावे करावेत यासाठी पाठपुरावा करण्यात आला. त्यानुसार ही घरे ठाकरे-वायकर यांच्या नावेदेखील झाली होती. त्यांची घरपट्टीही ते भरत होते. नंतर मात्र हे प्रकरण अडचणीचे ठरू शकते लक्षात आल्यावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी दबाव टाकून 2022मध्ये कागदपत्रामंध्ये फेरफार करून बनावट कागदपत्रांच्या आधारे या घरांची नोंदणी रद्द करून घेतली आणि बंगले जमीनदोस्त केले, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता.
या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही किरीट सोमय्या यांनी केली. त्यांचा याबाबत पाठपुरावाही सुरू होता. अखेर बुधवारी (दि. 23) रात्री रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. भा. दं. वि. कलम 420, 465, 466, 468 आणि 34 अन्वये हा गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणाचा अधिक तपास निरीक्षक देविदास मुपडे करीत आहेत.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply