उरणमधील शाळेचा अजब कारभार
उरण : बातमीदार
2022 सालच्या नोव्हेंबर महिन्यात उरण तालुक्यातील युईएस शाळेत इयत्ता दुसरी तुकडी अ या वर्गात शिकत असलेली उरण तालुक्यातील हनुमान कोळीवाडा येथील हर्षी भक्तेश म्हात्रे हिचे नोव्हेंबर 2022 मध्ये निधन झाले तरीही यु ई एस शाळा व्यवस्थापनाने तिच्या पालकांना फी भरण्यास सांगितले आहे. नोव्हेंबर 2022 ते फेब्रुवारी 2023 दरम्यानची फी त्वरित भरा अशी पावती (नोटीस) दिल्याने म्हात्रे कुटुंबीयांना धक्का बसला. या अशा शाळा व्यवस्थापनाच्या बेकायदेशीर व भ्रष्ट कारभारामुळे उरण मधील पालक वर्ग, जनते मध्ये तीव्र संतापाची भावना पसरली आहे. सविस्तर वृत्त असे की, उरण तालुक्यातील नामांकित उरण एज्युकेशन सोसायटीची युईएस इंग्रजी माध्यमाची 12 पर्यंत शाळा आहे. या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत हनुमान कोळीवाडा येथील रहिवासी भक्तेश म्हात्रे यांच्या आठ वर्ष वयाच्या दोन जुळ्या मुली दुसरीत शिकत होत्या. या दोन जुळ्या मुलींपैकी हर्षी हिचे 1 नोव्हेंबर 2022 रोजी दुदैवाने अकस्मित निधन झाले आहे. मुलीच्या निधनानंतर पालकांनी वर्ग शिक्षक,शाळा व्यवस्थापनाची भेट घेऊन याबाबत माहिती दिली आहे. मृत्युपत्र सादर करून हर्षीचे नावही शाळेच्या रजिस्टरमधुन नोव्हेंबर महिन्यातच कमी केले आहे, मात्र चिमुकल्या हर्षीच्या अकस्मित दुदैवी निधनाने पालक दुखातुन अद्यापही सावरलेले नसताही 24 फेब्रुवारी रोजी शाळा व्यवस्थापनाने मृत हर्षीची माहे नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत 6000 रुपये फी तत्काळ भरण्यासाठी नोटीस बजावली आहे. हर्षी भक्तेश म्हात्रे हिचे नोव्हेंबर महिन्यात अकस्मित निधन झाल्यानंतर शाळेच्या रजिस्टरमधुन नाव कमी करण्यात आले आहे, मात्र त्यानंतरही येथील युईएस शाळेने पालकांना त्वरित फी भरण्यासाठी नोटीस बजावली आहे.
शिक्षण घेण्याचा हक्क प्रत्येकाला आहे, मात्र फी वसुली संदर्भात वेगवेगळ्या पद्धतीने शाळा व्यवस्थापनरकडुन पालकांना त्रास देणे सुरूच आहे.
-प्राजक्ता गांगण, युईएस शाळेच्या पालक-शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा
शाळा व्यवस्थापनाची चुक झाली आहे. फी वसुलीसाठी नोटीस काढणार्या शिक्षक, कर्मचार्यांनी विद्यार्थिनींच्या पालकांची भेट घेऊन माफीही मागितली आहे.
-तनसुख जैन, युईएस संस्थेचे अध्यक्ष