विद्यार्थी, रुग्णांचे हाल; राजिपचे दुर्लक्ष
कर्जत : प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील रेल्वेपट्ट्यात असलेल्या आंबिवली, माणगाव, बेकरे आणि आंबिवली येथून एकसल गावाकडे जाणार्या रस्त्याची दूरवस्था झाली आहे. या रस्त्यावर अनेक वर्षे डांबर पडलेले नाही आणि त्यामुळे स्थानिकांना खड्डेमय आणि धुळीच्या रस्त्याने प्रवास करावा लागत आहे. या सर्व रस्त्याचे डांबरीकरण व्हावे यासाठी आंबिवली गावातील महेश भगत यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. कर्जत-कल्याण या राज्यमार्गापासून साधारण अंदाजे एक-दिड किमी अंतरावर वसलेले आंबिवली-माणगांव-बेकरे गावात येणार्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. मागील अनेक वर्षांपासून या गावांतील रस्ते नव्याने बनविण्यात आलेला नाहीत. मागील वर्षी जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे या रस्त्यांना अनेक ठिकाणी खड्डे पडले असून रस्ता खचलेला आहे, तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रस्त्यात टाकलेल्या मोर्यांनादेखील भगदाड पडले असल्यामुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आंबिवली गावाकडे येत असलेल्या रस्त्याचा वापर गावाला लागून असलेल्या कुंभे आणि एकसल गावाकडे जाणारे नागरिकदेखील याच रस्त्याचा वापर करतात, तसेच बेकरे गावाकडे जाणार्या रस्त्याचा वापर आसल पाडा या गावाचे नागरीक करतात. आंबिवली-माणगांव-बेकरे गावात येणारा रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे. आंबिवली गावातील कार्यकर्ते महेश भगत यांनी रायगड जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्याकडे ऑक्टोबर 2022पासून लेखी पत्रव्यवहार करून पाठपुरावा सुरू केला आहे. आपल्या अर्जाचा विचार करून लवकरात लवकर कर्जत-कल्याण राज्यार्गापासून आंबिवली-माणगांव-बेकरे गावात येणार्या रस्त्याचे डांबरीकरण व रुंदीकरण करावे, अशी मागणी केली आहे.