Breaking News

शेकापला धक्का; पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील समर्थकांसह भाजपमध्ये दाखल

मुंबई : रामप्रहर वृत्त
शेतकरी कामगार पक्षाला रायगड जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. पेण विधानसभा मतदारसंघाचे शेकापचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी मंगळवारी (दि. 28) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश समारंभास भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी मंत्री व विद्यमान आमदार रविशेठ पाटील, आमदार निरंजन डावखरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, सरचिटणीस विजय चौधरी, विक्रांत पाटील, जिल्हा संघटक सरचिटणीस सतीश धारप, अविनाश कोळी, मिलिंद पाटील, उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, राजेश मपारा, गीता पालरेचा, युवा मोर्चा दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अमित घाग, पेणच्या माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील, गटनेते अनिरूद्ध पाटील यांच्यासह पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी माजी आमदार धैर्यशील पाटील, त्यांच्या सुविद्य पत्नी व रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष नीलिमा पाटील, माजी जि. प. सदस्य महादेव दिवेकर, डी. बी. पाटील, प्रभाकर म्हात्रे, पं.स.च्या माजी सभापती मनीषा भोईर, माजी उपसभापती रूचिता पाटील, माजी सदस्य सुनील गायकर, सरिता म्हात्रे, निळकंठ दिवेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ, खरेदी विक्री संघाचे प्रमुख बापू दळवी, माजी नगरसेवक शोमेर पेणकर, माजी नगरसेविका सुनिता जोशी, ममता पाटील, विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या सर्वांचे मान्यवरांनी स्वागत केले.
रायगड जिल्ह्यातील पाली येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गीता पालरेचा आणि अलिबागमधील शेकापचे दिलीप भोईर यांनी यापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता पेणमधून माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी विकासाचे ‘कमळ’ हाती घेत शेकापसह महाविकास आघाडीला जबरदस्त धक्का दिला. नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या कोकण शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले होते. त्यांनी शेकापच्या बाळाराम पाटील यांचा दारुण पराभव केला. या पराभवाचा धक्का ताजा असतानाच शेकापला धैर्यशील पाटील यांच्या पक्षप्रवेशाच्या रूपाने नवा हादरा बसला आहे.
माजी मंत्री मोहन पाटील यांचे राजकीय वारस
पेण म्हटले की माजी मंत्री मोहन पाटील यांचे नाव पुढे येते. समाजशील नेतृत्व म्हणून ते सर्वत्र परिचित होते. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात त्यांनी राज्यमंत्रिपद भूषविले. दांडगा जनसंपर्क व पेणच्या राजकारणावर पकड असलेल्या कै. मोहन पाटील यांचा वारसा पुढे त्यांचे पुत्र धैर्यशील पाटील यांनी चालवला. नेतृत्व आणि वक्तृत्व गुण ही त्यांची वेगळी ओळख आहे.
शिष्टाई कामी आली!
भाजपची ताकद वाढत असताना माजी आमदार धैर्यशील पाटील यांनीसुद्धा भाजपच्या राष्ट्रीय प्रवाह व विचारधारेत सहभागी व्हावे, अशा प्रकारची शिष्टाई भाजपच्या नेत्यांनी केली होती. याकामी प्रामुख्याने भाजपचे जिल्हाध्यक्ष व पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढाकार घेतला. पक्षनेतृत्व आणि माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्यात समन्वय साधला. त्यानुसार पाटील भाजपमध्ये दाखल झाले आहेत.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply