Breaking News

पनवेलसह परिसरात चोरांचा सुळसूळाट

घटना रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हान; प्रभावी उपाययोजनेची नागरिकांमधून मागणी

पनवेल : वार्ताहर
पनवेलसह परिसरात चोरांचा सुळसूळाट हात आहे. किमती दुचाकी व चारचाकी गाड्या, लॅपटॉप, मोबाईल तसेच रोख रक्कम चोरी झाल्याच्या घटना पनवेल परिसरात सर्रास होताना दिसत आहेत. या घटनांमुळे परिसरातील नागरिकांत भितीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांना रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. तसेच पोलिसांसमोर अशा चोरांना पकण्याचे आव्हान आहे. पहिल्या घटनेत पनवेल शहरातून 40 हजार रुपये सायलेन्सची चोरी झाली आहे. समीर शेठ (रा. ओंकार सोसायटी, परदेशी आळी) यांनी त्यांची इको गाडी ही राहत असलेल्या बिल्डींगच्या गेटच्या समोर उभी करून ठेवली होती. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गाडीचा सायलेन्सर (किंमत जवळपास 40 हजार रुपये) चोरुन नेला. याबाबतची तक्रार शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. गाडीच्या काचा फोडून आतमध्ये असलेला लॅपटॉप चोरुन नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून पनवेल शहरात उभ्या करून ठेवलेल्या दोन वाहनांच्या गाडीच्या काचा फोडून अज्ञात चोरट्यांनी लॅपटॉप चोरून नेले आहेत. राजन गुप्ता यांनी त्यांची गाडी मुनुत इंम्प्रेस बिल्डींगच्या पाठीमागील मोकळ्या जागेत उभी ठेवली असता अज्ञात चोरट्याने त्यांच्या गाडीची काच फोडून पाच हजार रुपये किंमतीचा एचपी कंपनीचा लॅपटॉप चोरुन नेला आहे. तर त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ उभ्या करून ठेवलेल्या गाडीचीसुद्धा काच फोडून महागडा लॅपटॉप अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे. तिसर्‍या घटना शहरातील ठाणा नाका येथील डी-मार्ट रेडी काऊंटर नंबर 4 येथून एका मुलीने रोख रक्कम लंपास केल्याची घडली आहे. या ठिकाणी असलेल्या डी-मार्ट रेडीमध्ये एक अनोळखी मुलगी या ठिकाणी येऊन तिने काऊंटर नंबर 4 मधून साडेसहा हजार रुपयाची रोख रक्कम चोरून नेले. याबाबतची तक्रार शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. चौथी घटना हिरो कंपनीच्या इलेक्ट्रो इसेंशिएना सायकलची चोरी अज्ञात चोरट्यांनी केल्याची घटना पनवेल शहरात घडली आहे. शहरातील प्रियदर्शनी सोसायटी येथे राहणारे परिक्षित पाटील यांनी त्यांची आठ हजार रुपये किंमतीची सिल्व्हर-ग्रे व हिरव्या पट्ट्या असलेली हिरो कंपनीची इलेक्ट्रो इसेंशिएना सायकल ही जीन्याच्या खाली साखळी लावून ठेवली असता अज्ञात चोरट्याने सदर सायकल चोरुन नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पाचव्या घटनेत पनवेल जवळील कोळखे गाव येथील वासन टोयोटो शोरुममधून अज्ञात चोरट्याने रोख रक्कम चोरून नेली आहे.वासन टोयोटो शोरुम येथील प्रवेशद्वारच्या काचेच्या दरवाजाला साखळीला लावलेला लोखंडी लॉक अज्ञात चोरट्याने तोडून त्यावाटे आत प्रवेश करून कॅश काऊंटरवरील खिडकीमधून आत प्रवेश करून ड्राव्हरमध्ये ठेवलेले जवळपास 33 हजार 290 रुपये एवढी रोख रक्कम चोरुन नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सहाव्या घटनेत कामोठे वसाहतीमध्ये उभी केलेली दुचाकी चोरीला गेली आहे. नरेष आदावडे यांनी कामोठे सेक्टर 7 मधील शीतलधारा कॉम्प्लेक्समधील मेडिकलसमोर उभी केलेली दुचाकी चोरीला गेली आहे. सर्वत्र शोध घेऊनही न सापडल्यामुळे त्यांनी कामोठे पोलीस ठाण्यामध्ये चोरीची तक्रार दिली आहे.

नागरिकांना आवाहन
गेल्या काही दिवसापासून पनवेल शहरासह कळंबोली आदी परिसरात अशा प्रकारे लॅपटॉप चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. तरी वाहन मालकांनी गाडीमध्ये लॅपटॉप, कॅमेरे, मोबाईल फोन किंवा इतर मौल्यवान ऐवज गाडीत ठेवून बाहेर जावू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply