रोहे : प्रतिनिधी
यांत्रिकी पध्दतीने भात लागवड फायदेशीर असून त्याची प्रात्यक्षिके रोहा तालुक्यात घेण्यात आली आहेत. या यांत्रिकी पध्दतीच्या भात लागवडीचा लाभ शेतकर्यांनी घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी महादेव करे यांनी केले आहे.
मजूरांचा तुटवडा व त्यामुळे घटत चाललेले भात क्षेत्र यावर उपाय म्हणून यांत्रिक पध्दतीने भात लागवड करणे हा एकमेव उपाय आहे. हे लक्षात घेऊन चालू वर्षी रोहा तालुक्यामध्ये यंत्राने भात लागवड प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली आहेत. पारंपरिक पध्दतीने भात लागवड करण्यासाठी हेक्टरी सुमारे 8 ते 10 हजार खर्च येतो परंतु यंत्राने लागवड केल्यास दोन मजूर दिवसभरात तीन हेक्टर लागवड करू शकतात व हे यंत्र ताशी एक एकर क्षेत्रात लावणी करते व त्यासाठी ताशी एक लिटर पेट्रोल लागते. रांगेत लागवड झाल्यामुळे हवा, पाणी खेळते राहून पीक जोमदार येते. तसेच फुटवा अधिक येतो व उत्पादन वाढते. रांगेत लावणी झाल्यामुळे यंत्राने भात कापणी केल्यास नासाडी कमी होते. हे यंत्र खलाटी तसेच वरकस जमीनीवर चांगले चालते.
आजपर्यंत तालुक्यातील यशवंतखार, सांगडे व बोरघर या ठिकाणी यांत्रिकी पध्दतीच्या भात लागवडीची प्रात्यक्षिके झाली असून, त्याला शेतकर्यांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी महादेव करे यांनी दिली.