महापालिकेकडून पावसाळापूर्व कामांना वेग
पनवेल : वार्ताहर
पावसाळापूर्व कामांतर्गत धोकादायक झाडे तसेच झाडांच्या फांद्या छाटणीचे काम महापालिकेने सुरू केले आहे. सद्या खारघरमधील सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीला अडथळा आणणारी तसेच मोडकळीस आलेली झाडे आणि झाडांच्या फांद्या छाटणीचे काम जलदगतीने सुरू करण्यात आले आहे. टप्याटप्याने पालिका हद्दीतील पनवेल, कामोठे, कळंबोली या सर्व नोडमधील धोकादायक झाडांच्या फाद्यांची छाटणी केली जाणार असल्याची माहिती उपायुक्त कैलास गावडे यांनी दिली आहे. आयुक्त गणेश देशमुख यांनी पावसाळापूर्व कामाच्या सूचना पालिकेतील संबधित विभागास दिल्या आहेत. त्यानूसार उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाने आपल्या कामास सुरूवात केली आहे. सद्या खारघरमधील हिरानंदानी ते उत्सव चौक, बेलपाडा मेट्रो स्टेशन ते उत्सव चौक, उत्सव चौक ते सेंट्रल पार्क गार्डन खारघर गुरुद्वारापासून ओवे ग्राउंड सर्कलपर्यंतची रस्त्यावरील व डिव्हायडरमधील वाढलेल्या तसेच झुकलेल्या झाडांच्या फांद्यांची आवश्यकतेनुसार छाटणी करण्यात आलेली आहे.पावसाळ्यापूर्वी वाहतुकीस अडथळा आणणारी झाडे तसेच रस्त्यांच्याकडेला वाढलेल्या झाडांच्या फाद्यांच्या छाटणीसाठी मोठमोठ्या लॅडरचा उपयोग केला जात आहे. याशिवाय नागरिकांनी झाडांच्या फांद्या छाटणीसाठी केलेल्या तक्रारीही सोडविल्या जात आहेत. याचबरोबर खासगी झाडांच्या फांद्या सशुल्क तोडल्या जात आहे. उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाचे पथक विभाग प्रमुख संदिप पवार यांनी दिलेल्या सूचनेनूसार तत्परतेने कार्यवाही करत असून दररोजच्या कामाचा अहवाल सादर करत आहेत.