Breaking News

स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा ही तर आत्मजागरण यात्रा

आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन; पनवेलमध्ये कार्यक्रमांना प्रतिसाद

पनवेल ः प्रतिनिधी

स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा ही तर आत्मजागरण यात्रा असल्याचे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी (दि. 9) पनवेलमध्ये या यात्रेच्या समारोपावेळी स्वांतत्र्यवीर सावरकर चौकात केले. पनवेलमध्ये रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला. चौकाचौकात पुष्पवृष्टी करण्यासाठी महिला आवर्जून उपस्थित होत्या. पनवेल परिसरात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा मोठ्या उत्साहात काढण्यात आली होती. खारघरच्या लिटिल मॉलपासून संध्याकाळी 4.30 वाजता शेकडो दुचाकीस्वारांच्या या यात्रेला सुरुवात झाली. यात्रेत एका सजवलेल्या रथावर स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा होती. दुसर्‍या रथावर अंदमान तुरुंगाचा दरवाजा व त्याच्यासमोर बसलेले स्वातंत्र्यवीर असा देखावा होता. मार्गात ठिकठिकाणी त्याच्यावर पुष्पवृष्टी करण्यात येत होती. या गौरव यात्रेत भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, चिटणीस विक्रांत पाटील, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, जिल्हा विस्तारक अविनाश कोळी, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत, शहर अध्यक्ष वर्षा नाईक, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख रामदास शेवाळे, पनवेल महानगरप्रमुख अ‍ॅड. प्रथमेश सोमण, शहर संघटक अभिजित साखरे, मंदा जंगले, सुलक्षणा जगदाळे, आरपीआय आठवले गटाचे किशोर गायकवाड, माजी नगरसेवक-नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संस्था-संघटनाचे सदस्य, सावरकरप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गौरव यात्रा खारघरनंतर कळंबोली, कामोठे, खांदा कॉलनी व नवीन पनवेल अशी फिरून रात्री 9.30च्या सुमारास पनवेलमधील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात आली. तेथे ढोल ताशाच्या गजरात यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान आपला समजून यात्रेत सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे प्रथम आभार मानले. आपल्या देशाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली चहूबाजूने प्रगती होत असताना आपण आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देणार्‍या स्वातंत्र्यवीरांना विसरायचे का, असा सवाल त्यांनी विचारला. महात्मा गांधींनी सावरकरांना सोडायला सांगितले होते. त्यांचे आडनाव लावणारे मात्र सावरकरांचा अपमान करतात म्हणून आपल्याला जमावे लागले. आपल्या पुढच्या पिढीला सावरकरांच्या त्यागाची माहिती होण्यासाठी ही गौरव यात्रा काढली आहे. आपले भाग्य म्हणून आपल्याला या यात्रेत सहभागी होता आले, पण सावरकरांवर टीका करणार्‍यांना जाब विचारला पाहिजे. अपमान करणार्‍यांना लक्षात ठेवून त्यांचे पाप पदरात देऊया, असे ते म्हणाले. प्रमुख व्याख्याते अलिबागचे अ‍ॅड. श्रीराम ठोसर यांनी या वेळी  मै सावरकर नही म्हणणार्‍यांनी प्रथम सावरकर कोण होते हे समजून घेतले पाहिजे. काव्यात दहावा रस हा देशभक्तीचा असतो हे सावरकरांमुळे समजले. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात प्राण फुंकले. त्यांनी माफी मागितली म्हणता, मग ते तुरुंगात का गेले ते सांगा. त्यांना दोन जन्मठेप झाल्या, दोन वर्षांची शिक्षा झाली तरी एवढा कांगावा कशाला असा प्रश्न करून हिंदूत्व सांगणारे सावरकर काँग्रेसवाल्यांना आवडत नसल्याचे सांगितले. भाजपचे प्रदेश सचिव व यात्रेचे संयोजक विक्रांत पाटील यांनी, मला काम करताना लोकांचे स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील प्रेम पाहायला मिळाल्याचे सांगून दाढी वाढवून नरेंद्र मोदी होता येत नाही. जो काही बोलल्याने विनोद निर्माण होतो, त्याच्यावर मिम्स तयार होतात त्याचा शेखचिल्लीसारखा हा स्टंट फसला आहे, असा टोला राहुल गांधींना लगावला. स्वराज्याच्या सुराज्याची लढाई आपण लढत राहूया, असेही ते म्हणाले. शिवसेनेचे पनवेल महानगरप्रमुख प्रथमेश सोमण यांनी, राहुल गांधी यांच्यासाठी आंदोलन करायला 10 टकली यांना पनवेलमध्ये जमवता आली नाहीत, पण स्वातंत्र्यवीर सावरकरांविरुद्ध बोलल्यावर हजारो पनवेलकर एकत्र आले. त्यांच्या प्रेमाचा सागर तुम्हाला बुडवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा विरोधकांना दिला. शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांनीही या वेळी आपले विचार मांडले.

Check Also

विमानतळ कार्यरत होण्यापूर्वी दिवंगत लोकनेते दि.बा. पाटीलसाहेबांचे नाव देण्याबाबत कार्यवाही करावी

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय …

Leave a Reply