Breaking News

‘अवकाळी’, गारपिटीचा फटका

जागतिक हवामानात सतत बदल होत आहेत, महाराष्ट्राने खरिपामध्ये 30-70 टक्के जास्त पाऊस पहिला. नंतर रब्बी हंगामात वादळासह अवकाळी पाऊस ही अनुभवला. आता तापमानात सर्वसाधारण वाढ होणार हे मान्य केले गेले आहे. त्यामुळे यापुढे हवामान बदल गृहीत धरून पीक पद्धती, कृषी संशोधन आणि तंत्रज्ञानात आमूलाग्र बदल करावे लागणार आहेत. महिनाभरात सतत कुठे ना कुठे पाऊस पडत आहे. वादळ-वार्‍यामुळे शेती हा व्यवसाय पूर्णपणे उघड्यावर पडला आहे. हवामान बदलामुळे भविष्यात शेतीव्यवसाय पूर्णपणे धोक्यात येऊ शकतो. देशातील अनेक राज्यांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला आहे. त्यातही सर्वांत जास्त नुकसान महाराष्ट्रात झाले आहे. भारतीय द्वीपकल्पाच्या दोन बाजूंना अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर आहे. महाराष्ट्रात या दोन्ही दिशांकडून येणारे वारे वाहत असतात. या वाहणार्‍या वार्‍यांची दिशा वेगवेगळी असते. समुद्राकडून येणार्‍या वार्‍यांमध्ये बाष्प असते. हे वारे उष्ण असतात. हे वारे महाराष्ट्रात वाहात असतानाच उत्तरेकडून थंड आणि कोरडी हवा वाहू लागते. हे दोन्ही परस्परविरोधी वारे एकमेकांशी भिडतात. हे दोन्ही वारे एकमेकांशी भिडण्यासाठी महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती अनुकूल आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मार्च-एप्रिलमध्ये पाऊस पडताना दिसतो आहे.सद्यस्थितीत राज्यातील शेतकर्‍यांना अवकाळी पाऊस, गारपीट, वादळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देताना काही गोष्टी प्राधान्याने कराव्या लागतील. या आपत्तीत राज्यातील साधारण 42 हजार हेक्टरवरील पिके नष्ट झाली आहेत. त्यातल्या त्यात फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. रब्बीच्या पिकांपैकी गहू, हरभरा, तूर, रब्बी-ज्वारीला फटका बसला आहे. फळबागांमध्ये सर्वाधिक नुकसान डाळिंब, द्राक्ष, आंबा, संत्रा, केळी आणि काजू या पिकांचे झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार, राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये मिळून झालेले नुकसान जवळपास पाच हजार कोटींच्या घरात आहे. नुकसानीचा हा आकडा निश्चित करून धान्य पिके आणि फळपिकांसाठी प्रति हेक्टरी मदत तातडीने दिली जाणे आवश्यक आहे. बँकाकडून शेतकर्‍यांना तात्पुरते कर्ज मिळवून देण्याबरोबरच थकीत कर्जाच्या परतफेडीला मुदतवाढ देण्याचीही गरज आहे. त्याशिवाय शेतीतील रोजचा खर्च भागवण्यासाठी शेतकर्‍यांना बँकांकडून कमी  व्याजदराने कर्ज देण्याची व्यवस्था केंद्र आणि राज्य सरकारने केली पाहिजे. यासोबतच आगामी खरीप हंगामासाठी शेतकर्‍यांना लागणारे बी-बियाणे, खते यांची तरतूद वेळेवर करण्याचीही गरज आहे. अर्थसाह्य आणि अन्य मदतीचे  उपाय केल्यास शेतकरी या ‘अवकाळी’च्या संकटातून सावरू शकेल. या तात्कालिक उपायांबरोबरच, हवामान बदलामुळे ‘अवकाळी’सारखी संकटे सतत येत राहतील हे गृहीत धरून काही दीर्घकालीन उपाययोजना हाती घ्याव्या लागतील. त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा सक्षम वापर, संशोधनामध्ये नवा विचार, प्रचलित पीक पद्धतीचा फेरविचार, उत्पादन आणि बाजार, वितरण व्यवस्थापनातील सुसूत्रता तसेच नवतंत्रज्ञान व नवसंशोधन वापरातील धोरणात्मक अडचणी या बाबींकडे प्राधान्याने लक्ष द्यावे लागेल. संशोधनाची दिशा बदलायला हवी जागतिक हवामानात सतत बदल होत आहेत. आता तापमानात सर्वसाधारण वाढ होणार हे मान्य केले गेले आहे. त्यामुळे यापुढे वातावरण बदल गृहीत धरून पीक पद्धती, कृषी संशोधन आणि तंत्रज्ञानात आमूलाग्र बदल करावे लागतील. सरकारने यामध्ये कृषी विद्यापीठांना मार्गदर्शक सूचना दिल्या आणि पारंपरिक संशोधनाची दिशा बदलण्यास प्रवृत्त केले, तर निश्चितपणे भविष्यात शेतकरी अशा प्रकारच्या हवामान बदलाला सामोरे जाण्यास सज्ज होईल. नवीन आव्हानांचा सामना करण्यासोबतच, शेतकर्‍यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठीची धोरणे, संशोधन आणि गुंतवणुकीचा सर्वसमावेशक आढावा घेऊन त्याची योग्य अंमलबजावणी केली, तर स्वातंत्र्याच्या शतक महोत्सवापर्यंत भारत एक समृद्ध राष्ट्र म्हणून पुढे येईल.

-नितीन देशमुख

Check Also

सीकेटी विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त दिंडी

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन …

Leave a Reply