Breaking News

सीकेटी महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्टस्, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेजमध्ये (स्वायत्त) पदवी आणि पदव्युत्तर वर्षाच्या वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळ्याचे आयोजन मंगळवारी (दि. 18) करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भूषविले, तर प्रमुख पाहुणे म्हणून एमकेसीएलचे मुख्य मार्गदर्शक आणि माजी व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत उपस्थित होते.
या सोहळ्यास संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य अनिल भगत, हरिश्चंद्र पाटील, कॉलेज डेव्हलपमेंट कमिटीचे सदस्य विनायक कोळी, शाहू संस्थेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे व्यवस्थापकीय संचालक जयंत भगत, संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली. त्याचप्रमाणे प्राचार्य डॉ. एस. के. पाटील यांच्यासह कला, वाणिज्य व विज्ञान विद्याशाखांचे प्रमुख आणि विविध विभागांचे प्रमुख मंचावर मान्यवरांसोबत उपस्थित होते.
या वेळी प्रमुख पाहुणे विवेक सावंत यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, आयुष्यात यश महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर उत्कटता आणि आत्मियता हे यशाचे निर्धारक आहेत. स्वतःचा शोध घेणे हा उच्च शिक्षणाचा उद्देश आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाचे महत्त्व पटवून देताना त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा तुमच्या आयुष्याचा जोडीदार आहे आणि त्यामुळे तुमचे करिअर संपुष्टात येणार नाही.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांबरोबर त्यांच्या पालकांचे तसेच शिक्षकांचे कौतुक केले. त्याचबरोबर विद्यार्थांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्राचार्य डॉ. एस. के. पाटील यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले तसेच प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. त्यांनी आपल्या भाषणामध्ये महाविद्यालयाच्या गौरवशाली परंपरांचा आढावा घेतला. या वेळी पदवीप्राप्त तसेच विद्यावाचस्पतीप्राप्त विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ आणि प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परीक्षा नियंत्रक डॉ. एस. आय. उन्हाळे, विद्यार्थी परिषद व विद्यार्थी कल्याण कक्षाच्या अध्यक्षा डॉ. एम. ए. म्हात्रे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. बी. डी. आघाव यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. आर. व्ही. येवले व प्रा. ए. व्ही. पाटील यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉ. उन्हाळे यांनी मानले.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply