Breaking News

पनवेल रेल्वे स्टेशन सुविधांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

मुंबईचे प्रवेशद्वार समजल्या जाणार्‍या पनवेलचे रेल्वे स्थानक महत्वपूर्ण मानले जाते. या स्टेशनवरील नवीन पनवेलकडे जाण्यासाठी असलेला फूट ब्रिज धोकादायक झालेला आहे. फूट ब्रिजचे लोखंडी पोल सडले आहेत. मालगाडी खालून गेल्यावर त्याला हादरे बसतात पण रेल्वे प्रशासन त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. सन 2019 नंतर या पुलाचे स्ट्र्क्चरल ऑडिट झालेले नाही. या एकमेव नवीन पनवेलकडे जाणार्‍या पुलावर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यामुळे एल्फिस्टन स्टेशन किवा सी.एस.टी. येथील पूलासारखी दुर्घटना घडू शकते. येथे दुर्घटना घडल्यास नवीन पनवेलमध्ये जाण्यास कोणतीही पर्यायी व्यवस्था या स्टेशनमध्ये नाही यासाठी रेल्वे प्रशासनाने त्याबाबत दक्षता घेणे गरजेचे असताना तिकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. याबाबत प्रवासी संघटनेचे पदाधिकारी मूग गिळून बसलेले दिसत आहेत.
मध्य रेल्वेचे पनवेल रेल्वे स्टेशन हे मोठे जंक्शन आहे. येथे क्रमांक 1 ते 4 फलाटावर लोकल गाड्या तर क्रमांक 5 ते 7 वर लांब पल्ल्याच्या गाड्या येत असतात. फलाट क्रमांक 5 ते 7 हे नवीन पनवेल बाजूला आहेत. पनवेल शहराचा मोठ्या प्रमाणात विकास हा नवीन पनवेल बाजूला झाला आहे. या बाजूला मोठ्या प्रमाणात रहिवासी वसाहती व इंजिनियरिंग व इतर महाविद्यालये असल्याने प्रवाशांची विद्यार्थ्यांची जा-ये असते. याबाजूला जाण्यासाठी 6 फूट रुंदीचा पूल आहे. लोकल थांबल्यावर अनेक जण या पुलावर जाण्यासाठी फलाटावरून धावत जात असतात. फलाट क्रमांक 6 किवा 7 वर एक्स्प्रेस किवा ईमू गाडी फलाटावर आल्यास गर्दीमुळे पुलावर चढणे म्हणजे दिव्यच असते पुलावर प्रवाशांची कोंडी होते.
पनवेल रेल्वे स्टेशनमधून नवीन पनवेलमध्ये जाण्यासाठी 80 च्या दशकात लोखंडी फूट ब्रिज बांधण्यात आलेला आहे. लांब पल्ल्याच्या गाडीत बसण्यासाठी ही याच पूलाचा वापर करावा लागतो. या पूलावरून रोज लाखो रेल्वे प्रवाजी जात असतात. या पुलाचा नवीन पनवेल बाजूकडून दूसरा आणि तिसरा लोखंडी खांब वरच्या बाजूला पूर्ण सडलेला आहे. तुळई आणि स्तंभाच्या जोडणीच्या ठिकाणी स्तंभामध्ये गंज सुरू झाला आहे.स्तंभ विभागाच्या क्रॉस सेक्शनल क्षेत्रामध्ये घट झाली आहे. गंज वेब आणि लांबीच्या बाजूने फिरत आहे. फ्लँजपैकी एक वेबपासून जवळजवळ विभक्त आहे. जेव्हा एक्स्प्रेस आणि लोकल गाड्या एकाच वेळी येतात तेव्हा पादचारी मोठ्या प्रमाणात येत असल्याने मोठे वजन पूलावर येते. अशावेळी पूलाच्या ताकदीचे हे कमी झालेले गुणधर्म कोणत्याही चेतावणी सिग्नलशिवाय अचानक अपयशी ठरू शकतात. त्वरित दुरुस्तीने हे टाळले जाऊ शकते अशी माहिती एका प्रत्यदर्शी अभियंत्याने दिली आहे. या पूलाच्या खाली नवीन रेल्वे मार्गाचे काम सुरू असल्याने जेसीबी लावून तेथे खड्डे खणतानाही हादर्‍याने त्याच्या स्ट्र्क्चरला धक्के बसले आहेत. पूलाखालून मालगाडी गेल्यावर हादर्‍याने पूल हालतो याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळी वजन सहन न झाल्याने हा पूल केव्हाही मोडून पडून चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशहा येथील दुर्घटने सारखी दुर्घटना घडू शकते.
रेल्वेच्या विभागीय सल्लागार समितीचे सदस्य व प्रवासी संघटनेचे सचिव श्रीकांत बापट यांना सडलेले खांब प्रत्यक्ष नेऊन दाखवले. त्यावेळी त्यांनी नेहमीप्रमाणे पेपरातील बातमी दाखवून ’अरे, मला दहा बायांचे फोन आले’ असे सांगीतले. पण रेल्वे अधिकार्‍यांना खुश करून आपल्याला विभागीय समितीचे सदस्यपद मिळवण्यात धन्यता मानणार्‍यांनी त्याबाबत कोणतीही हालचाल केली नाही. उलट स्टेशनवरील फलाट क्रमांक 5 वरील लिफ्टचा दरवाजा चुकीच्या बाजूला केल्याने प्रवाशांना अडचण होत असताना लिफ्ट सुरू झाल्याची बातमी छापू नका पण त्याबाबत वरिष्ठ अधिकारी नाराज होतील म्हणून निषेध करू नका असे सांगितले.
पनवेल जंक्शनचे काम सुरू असल्याने त्यामध्ये नवीन पनवेलमध्ये जाण्यासाठी भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहे. त्याचे काम सुरू होते पण खडक लागल्याने सदर काम दोन वर्षापूर्वी थांबवण्यात आले. सुरुंग न लावता खडक फोडण्याचे नवीन तंत्रज्ञान वापरण्यात येणार असल्याचे सांगितले जाते पण त्याला अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. त्यामुळे हा पूल कोसळल्यास नवीन पनवेलला येण्यासाठी दूसरा मार्ग उपलब्ध नाही. याबाबत ही प्रवासी संघटना गप्प आहे एसटी आगाराबाबत यांनी सहा महिन्यापूर्वी आंदोलनाचा फार्स केला. आगाराचे काम सुरू होणे दूरच आगारातील खड्डेही पूर्ण न भरताच याची बोळवण करण्यात आली. त्यामुळे आता यांच्यावर विश्वास न ठेवता प्रवाशांनी स्वत:च रेल्वे पुलाबाबत आवाज उठवणे गरजेचे आहे.
-नितीन देशमुख

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply