तत्कालीन अधिकारी, ठेकेदारविरोधात गुन्हा दाखल
अलिबाग : प्रतिनिधी
आदिवासींसाठी असलेल्या योजनांमधील 13 लाख 24 हजार 527 रुपयांच्या निधीचा अपहार पेण येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने चौकशीसाठी गठीत केलेल्या पाच सदस्यीय गायकवाड समितीने केलेल्या चौकशीत हा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. त्यानुसार दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आदिवासींसाठी राबविण्यात येणार्या योजनांसाठी निकृष्ठ दर्जाचे साहित्य, खोटे लाभार्थी, बिलांच्या वाढीव रकमांमधून भ्रष्टाचार होत असल्याने पेण येथील एकात्मिक आदिवासी विकास महामंडळाच्या सबंधीत अधिकार्याची चौकशी करावी, अशी याचिका नाशिक येथील एका सामाजिक संस्थेने पुराव्यानीशी मुंबई उच्च न्यायालयात सन 2012 मध्ये दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीच्यावेळी उच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनास या आरोपींची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, असे आदेश दिले. त्यानुसार शासनाने पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत केली.
न्यायालय व समितीने आदिवासी विकास महामंडळ या कार्यालयातील कागदपत्रांची पाहणी व सखोल चौकशी करून आदिवासी विकास विभागातील गैरव्यवहार अफरातफर व फसवणुकीचे प्रकार उघडकीस आणले. त्यानंतर संबंधितांविरूद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आदिवासींच्या विविध योजनांसाठी सन 2004 ते 2009 या कालावधीत विविध योजनांवर खर्च करताना मोठ्या प्रमाणात अफरातफर, फसवणूक केल्याप्रकरणी तत्कालीन प्रकल्प अधिकारी रावसाहेब मोकाशी व पुरवठादार यांच्याविरोधात पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.