आमदार रविशेठ पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पेण ः प्रतिनिधी
कोरोना विषाणूच्या प्रादुभार्वामुळे देशात लॉकडाऊन व संचारबंदी लागू असल्याने छोटे-मोठे व्यवसाय ठप्प झाले आहेत. ते लक्षात घेता पेण आणि महाड औद्योगिक भागातील लॉकडाऊनचे निर्बंध अंशतः शिथिल करावे, अशी मागणी पेण विधानसभा मतदारसंघाचे आमदार रविशेठ पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
रायगड जिल्ह्यातील पेण तसेच महाड येथील एमआयडीसी अंतर्गत असणारे औद्योगिक कारखाने बंद आहेत व या कारखान्यांवर अवलंबून असणारे लहान-मोठे उद्योगही यामुळे अडचणीत आले आहेत. कामगारवर्ग यात भरडला जात आहे. विशेष म्हणजे पेण व महाड तालुक्यात अद्यापपर्यंत एकही कोरोना रुग्ण आढळून आलेला नाही. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पनवेल व उरण तालुका हा कोरोनाबाधित भाग वगळता पेण व महाड औद्योगिक क्षेत्रातील लॉकडाऊनचे निर्बंध अंशतः कमी करण्यात यावे, असे आमदार रविशेठ पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.