पालिका प्रशासनाकडून होल्डींग पाँड व पंप हाऊसची पाहणी
नवी मुंबई : बातमीदार
नवी मुंबई शहर समुद्र सपाटीपासून खालच्या पातळीवर वसलेले असल्याने सिडकोने शहर निर्मिती करताना भरतीचे पाणी काही काळापुरते साठवून ठेवण्यासाठी धारण तलाव (होल्डींग पॉँड) निर्माण केलेले आहेत. पावसाळ्यात पाणी साचून राहू नये म्हणून महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी शहर अभियंता संजय देसाई यांच्यासह सेक्टर 12 सीबीडी बेलापूर तसेच सेक्टर 8 वाशी येथील होल्डींग पाँडना त्याचप्रमाणे तेथे असलेल्या पंप हाऊसला भेटी देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली.
या वेळी अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड, कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे, अजय संख्ये, सुनील लाड आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. सीबीडी बेलापूर व वाशी या दोन्ही ठिकाणी होल्डींग पॉँड परिसराची पाहणी करताना खारफुटीला बाधा न पोहचता व सीआरझेडच्या नियमांचे उल्लंघन न करता यांत्रिकी पध्दतीने शक्य होईल तेवढा गाळ काढून होल्डींग पॉँडची पाणी साठवण क्षमता थोड्याफार प्रमाणात का होईना वाढविण्याच्या दृष्टीने तत्पर कार्यवाही करावी असे निर्देश आयुक्तांनी या वेळी दिले. त्यासोबतच एमसीझेडएकडून गाळ काढण्याची परवानगी प्राप्त करण्याचा पाठपुरावा सुरू ठेवावा, असेही आयुक्तांनी सूचित केले. पंप हाऊसचे काम करण्यासाठी उच्च न्यायालयाची परवानगी मिळविण्याची प्रक्रिया पावसाळी कालावधीत पूर्ण करून घ्यावी व पावसाळ्यानंतर लगेचच दोन्ही पंप हाऊसची बांधकामे सुरू करावीत, असेही आयुक्तांनी या वेळी निर्देश दिले. पावसाळी कालावधीत विद्युत पुरवठा खंडीत झाल्यास जनरेटरची पर्यायी व्यवस्था कार्यान्वित ठेवावी तसेच पावसाळी कालावधीत सर्व पंप सुरू राहतील याकडे काटेकोर लक्ष द्यावे आणि पर्यायी पंपांची व्यवस्था करावी, असेही आयुक्तांनी निर्देश दिले.
नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्या -आयुक्त
पावसाळ्यामध्ये कुठेही पाणी साचणार नाही याची आत्ताच खबरदारी घेऊन आवश्यक उपाययोजना त्वरित करून घ्याव्यात आणि पावसाळी कालावधीत नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची आगाऊ दक्षता घ्यावी असेही निर्देश आयुक्त राजेश नार्वेकर यांनी या पाहणी दौर्यात अभियांत्रिकी विभागास दिले.