Breaking News

तळोजा पापडीपाडा येथील मदार कॉलनीला 25 वर्षांनंतर पाणीपुरवठा

पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिका हद्दीत समावेश झालेल्या तळोजा पापडीपाडा येथील मदार कॉलनीला 25 वर्षांनंतर पाणीपुरवठा सुरू झाला आहे. त्याबद्दल तेथील महिलांनी भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांना धन्यवाद दिले आहेत.
तळोजा पापडीपाड्यातील मदार कॉलनीमध्ये स्वतंत्र नळजोडणी नसल्याने तेथील नागरिकांना पापडीपाडा येथे येऊन पाणी भरावे लागत असे. अनेक वेळा एका हंड्यासाठी दोन-दोन तास वाट पहावी लागायची. त्यामुळे महिला त्रस्त झाल्या होत्या. पनवेल महापालिका झाल्यावर माजी सरपंच मुनाफ पटेल, निर्दोष केणी, भाजप तळोजा अध्यक्ष शफी पटेल, माजी नगरसेवक हरेश केणी यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना येथील पाण्याचा प्रश्न सोडविण्याची विनंती केली.
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी दोन वेळा तेथे भेट देऊन संबंधित अधिकार्‍यांना पाण्याचा प्रश्न सोडविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार आठ दिवसांपूर्वी या भागात नळाचे पाणी सुरू झाले. त्यामुळे आनंदित झालेल्या येथील नागरिकांनी आमदार प्रशांत ठाकूर व माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचे आभार मानले आहेत.

आज आम्हाला खूप आनंद झाला आहे. मी शिक्षिका असून आमचे कुटुंब 25 वर्षे पापडीपाडा (मदार) येथे राहत आहे. माझे 15 वर्षांपूर्वी लग्न झाल्यापासून मी येथे आहे, मात्र पाणी नसल्याने हैराण झाले होते. एक वेळ जेवण नसले तरी चालेल पण पाणी हवे. पाण्यासाठी खारघरपासून तळोजापर्यंत फिरावे लागायचे. दोन-अडीच हजार खर्च करावे लागत होते. आता आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, शफी पटेल, निर्दोष केणी, मुनाफ पटेल यांच्या प्रयत्नाने पाणी मिळाले. त्यांना मनापासून धन्यवाद!
-स्नेहल डोंगरे

आम्हाला खूप आनंद झाला, कारण पाणी नसल्याने घरात इतर कामासाठी खारे पाणी वापरायला लागत होते, तर पिण्यासाठी गोड पाणी विकत घ्यावे लागत होते, परंतु आता नळाला रमजानपूर्वी पाणी आल्याने आम्हाला खूप आनंद झाला आहे.
-अफसाना पठाण

आम्हाला पाण्यासाठी वणवण फिरावे लागत होते. अनेक वेळा जेथून पाणी घ्यायचो त्यांच्या शिव्या खायला लागायच्या. कोणाची बोलणी ऐकायला लगायची. आमची मजबुरी होती. पाहुणे आले की लाज वाटायची. आज आमच्याकडे पाणी आल्याने खूप आनंद झाला आहे.
-नमिता जयस्वार

Check Also

खासदार सुनील तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

महायुतीकडून विजयाचा निर्धार अलिबाग : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांनी …

Leave a Reply