मार्च अखेर तीन कोटी एक लाखांचा गल्ला
महाड : प्रतिनिधी
नगर परिषदेकडे कर्मचारी तुटवडा असतानादेखील महाडमध्ये घरपट्टी वसुली जोमाने सुरु आहे. मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत वसुली विभागाने आपले लक्ष 84 टक्के पूर्ण केले आहे. आतापर्यंत सुमारे तीन कोटी एक लाख रुपये घरपट्टी वसुली करण्यात आली आहे.
घरपट्टी वसुल करणे, हे तसे जिकीरीचे काम आहे. एकीकडे कर्मचार्यांचा तुटवडा आणि दुसरीकडे कर वसुलीचे लक्ष पूर्ण करणे अशा कात्रीत असूनही महाड नगर परिषदेच्या उर्वरित कर्मचार्यांनी आपले लक्ष पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न केला आहे. महाड नगर परिषद क्षेत्रात 17 प्रभाग आणि 12 हजार बांधकामे नोंदणीकृत आहेत. शहरात घराकरिता 1100, सोसायटीकरिता 1500 आणि व्यवसायिक वापरासाठी 3840 इतकी घरपट्टी आकारणी केली जाते. केवळ तीन कर्मचारी सध्या घरपट्टी वसुलीचे काम करीत आहेत. मार्च अखेरपर्यंत महाड नगर परिषदेला तीन कोटी बहात्तर लाख रुपये वसुलीचे लक्ष होते. यामध्ये जवळपास 84 टक्के म्हणजे तीन कोटी एक लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे.
घरपट्टीच्या तुलनेत पाणीपट्टी वसुलीची टक्केवारी मात्र कमी आहे. महाड शहरात 5800 नळ जोडण्या असून, यामधून एक कोटी 62 लाख रुपये वसूल होणे अपेक्षित आहे. मात्र मार्च अखेर 66 लाख रुपये पाणीपट्टी वसूली करण्यात आली आहे. पाणीपट्टी आणि घरपट्टी वसुली करिता तीन कर्मचारी काम करीत आहेत.
आमच्यापुढे असलेले लक्ष पूर्ण करीत आणले आहे. जनजागृती आणि देण्यात आलेल्या नोटीसा यामुळे वसुली करण्यात अडचण निर्माण झाली नाही.
-शिवा करकरे, वसुली अधिकारी, महाड नगर परिषद
जनजागृती आणि नोटीसचा फायदा
कर वसुलीबाबत कायम जाहिरात देऊन जनजागृती केली जात आहे. भावनिक मुद्दे घेऊन जाहिरात फलकदेखील लावण्यात आले आहेत. शिवाय मार्चनंतर महाड शहरात 315 जणांना नोटीस बजावण्यात आली. नोटिसांमुळे 1 एप्रिल ते 17 मेपर्यंत 27 लाख घरपट्टी, पाच लाख पाणीपट्टी वसूल करण्यात आली आहे.