नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
भाजपने लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता संसदेतील नव्या सरकारच्या पहिल्या अधिवेशनासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. हे अधिवेशन 5 ते 15 जून या काळात सुरू होण्याची शक्यता आहे, तर जुलै महिन्यात मोदी सरकार आपला पहिला पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामधून सरकार अनेक महत्त्वपूर्ण घोषणा करण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत तब्बल 303 जागा जिंकून विक्रमी कामगिरी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांच्या आईची भेट घेण्यासाठी गुजरातला आले. 30 मे रोजी होणार्या शपथविधीत काही खासदार मंत्री म्हणून शपथ घेतील. यानंतर आठवडाभरात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने संसदेच्या अधिवेशनाला सुरुवात होईल. या अधिवेशनात नवनिर्वाचित खासदारांना शपथ दिली जाईल. भाजपने लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रसिद्ध केलेल्या संकल्पपत्रात अनेक महत्त्वपूर्ण आश्वासने दिली. त्यांची घोषणा अर्थसंकल्पातून केली जाऊ शकते. अल्पभूधारक शेतकरी, लहान दुकानदारांना निवृत्ती वेतन, जीएसटीच्या टप्प्यात महत्त्वाचे बदल, सर्वांना कर्जमाफी अशा महत्त्वपूर्ण घोषणा अर्थसंकल्पातून केल्या जाऊ शकतात.