Breaking News

पनवेल एसटी स्थानक होतेय चकाचक

एसटी स्थानक म्हटले म्हणजे अस्वच्छता , बसायला मोडकी बाके, आजूबाजूला मारलेल्या पिचकार्‍या आणि अस्वच्छ शौचालय हे चित्र डोळ्यासमोर येते, पण पनवेल एसटी स्थानकावर गेल्यावर सध्या वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. स्वच्छ फलाट तेथे ठेवलेल्या कुंड्या लक्ष वेधून घेतात. आजूबाजूचा परिसर ही स्वच्छ दिसतो आहे. त्यामुळे आपल्याला पनवेल स्थानकाचे रूप बदलेले पाहायला मिळत आहे.
मुंबईचे प्रवेशद्वार समजल्या जाणार्या पनवेल मधून कोकण,पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ येथून येणार्‍या-जाणार्‍या हजारो एस.टी च्या गाड्या पनवेल स्थानकावर येत असतात त्यातून दररोज हजारो प्रवाशी येत-जात असतात. याशिवाय नोकरी-धंद्यासाठी आजूबाजूच्या परीसरातून हजारो नागरिक या स्थानकातून प्रवास करतात. या स्थानकाच्या नुतनीकरणाचा प्रश्न तांत्रिक अडचणीत रेंगाळला असला तरी सध्या हे स्थानक कात टाकते आहे असे म्हणायला हरकत नाही. प्रवाशांना सुरक्षित प्रवासासोबत स्वच्छ आणि प्रसन्न वातावरण देण्याच्या उद्देशाने 1 मे रोजी मुख्यमंत्र्यांनी ’हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान’ जाहीर केले. रस्त्यावर धावणारी प्रत्येक बस स्वच्छ असेल, बसस्थानक व परिसर स्वच्छ व टापटीप असेल याबरोबरच प्रत्येक बसस्थानकावरील प्रसाधनगृहेही स्वच्छ व निर्जंतुक असतील याची खबरदारी घेण्यास सांगितले. त्यामुळे आता पनवेल स्थानक ही स्वच्छ दिसू लागले आहे.
एसटी महामंडळाचा अमृत महोत्सव साजरा होण्यापूर्वी पनवेल आगार प्रमुख म्हणून सुजीत डोळस यांनी पदभार घेतल्यावर पनवेल स्थानकातील अडचणी समजून घेतल्या. त्यांनी प्रथम आगाराची स्वच्छता हाती घेतली. खासगी सफाई कामगार पुरवणार्या एजन्सीकडून माणसे घेऊन आवारात वाढलेली झाडे झुडपे साफ केली. आवारातील कचरा दोन तासांनी उचलला जातो का नाही याची तपासणी केली जाते. येथील खाद्य पदार्थाच्या स्टॉल समोर कचरा दिसल्यावर लगेच त्याच्यावर कारवाई करण्यात येत आहे. स्थानकातील शौचालय गलिच्छ झाली होती ती दर दोन तासांनी पाणी ओतून स्वच्छ केली जाऊ लागली. प्रवासी त्याचा वापर करू लागल्याने परिसराती दुर्गंधी कमी झाली. आगारातून बाहेर पडताना गाडी स्वच्छ आहे का नाही याची तपासणी करूनच गाडी मार्गस्थ करण्यात येते. पनवेल आगारातून बाहेर पडताना दोन्ही गेटवरील गटारे तुंबली होती घाण पाणी रस्त्यावर येत होते. त्याबाबत महापालिकेला सांगून आता गटाराचे बांधकाम सुरू झाले आहे.
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियाना मध्ये लोकांच्या सहभागातून स्थानक स्वच्छ कारचे असल्याने विविध सामाजिक संस्था व लोकप्रतिनिधी यांचेकडे संपर्क साधून आगारात सुशोभीकरण करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहेत. सोमवारी भाजपचे ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष व प्रवासी वाहतूक सामाजिक संस्था, पनवेलचे अध्यक्ष अ‍ॅड. मनोज भुजबळ व सदस्य अशोक आंबेकर यांनी स्थानकाला भेट दिली. त्यांना येथील स्वच्छता आवडली फलाटावर कचरा टाकण्यासाठी कुंड्या कमी असल्याचे निदर्शनास आल्यावर त्या पुरवण्याची तयारी दर्शवली. याशिवाय एक दिवस 50 सफाई कामगार घेऊन येथील सफाई करून देणार असल्याची सांगितले. फलाटाचे बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत अनेकवेळा प्रवासी विधी करतात म्हणून त्याठिकाणी उद्यान करण्यासाठी सभागृह नेते परेश ठाकूर यांना सांगून मदत करण्याची तयारी दर्शवली. आगार प्रमुख स्वत: फलाटावर उभे राहून पनवेल आगाराच्या गाडीत लोकांना रांगेत प्रवेश देतात हे पाहून त्यांनी त्यांचे कौतुक केले.

स्वच्छतेबद्दल जाणीव-जागृती

बसेस, बसस्थानक व परिसर, प्रसाधनगृहे स्वच्छ करण्याची जबाबदारी एसटीच्या स्वच्छतेसाठी नेमलेल्या कर्मचार्‍यांची असली तरी बसमध्ये व बसस्थानकावर स्वच्छता राखणे, इतरत्र कचरा न टाकणे यासाठी वापरकर्त्या प्रवाशांमध्ये जनजागृती करणे तितकेच महत्त्वाचे आहे. याकरिता स्वच्छतादूत नेमून त्यांच्यामार्फत प्रवासी जनतेचे स्वच्छतेबाबत प्रबोधन करणे व त्यांचा सकारात्मक सहभाग नोंदवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी भित्तिपत्रके, सूचना वजा सुभाषिते, उद्घोषणा, यांचा प्रभावी वापर करून एसटी कर्मचारी व प्रवासी यांच्यामध्ये स्वच्छतेबद्दल जाणीव-जागृती घडवून आणण्याचा संकल्प केला आहे.

आमचा प्रवाशांना स्वच्छ गाडी पुरवणे व बस स्थानक स्वच्छ ठेवणे हा मुख्य उद्देश आहे, पण त्यासाठी प्रवाश्यांनी ही साथ देणे गरजेचे आहे. तसे झाले तर मुख्यमंत्र्यांच्या व प्रवशांच्या स्वप्नातील स्वच्छ स्थानक देणे शक्य होईल. प्रवाशांनी स्वयंम शिस्त पाळणे गरजेचे आहे. रांगेत गाडीत प्रवेश केला तर महिला व ज्येष्ठ नागरिकांना व्यवस्थित चढता येते. पाकीटमारी आणि चोरीच्या घटना कमी होऊ शकतात.
-सुजीत डोळस, आगार प्रमुख, पनवेल

कोरोनानंतर प्रथमच पनवेल आगारात आलो. येथील स्वच्छता पाहून समाधान वाटले. आगार प्रमुखांची त्याविषयीची तळमळ पाहून त्यांना महापालिका व आमच्या संस्थेतर्फे मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. प्रवाशांना रांगेचे शिस्त लागल्यास पाकीटमारी आणि चोरीच्या घटना कमी होऊ शकतात त्यामुळे प्रवाश्यांनी त्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे.
-अ‍ॅड. मनोज भुजबळ, अध्यक्ष, प्रवासी वाहतूक सामाजिक संस्था

आमच्या कर्मचार्‍यांनी कचरा उचलला की, लगेच त्या ठिकाणी काही प्रवासी हातातील कागद किवा प्लास्टिकची रिकामी बाटली टाकतात. फलाटावर कचर्‍याची कुंडी ठेवलेली आहे. त्यामध्ये टाकत नाहीत. त्यांनी आपला कचरा कचरा कुंडीत टाकणे गरजेचे आहे.
-रेणूका सोनवणे, सुपरवायझर, सफाई कामगार

Check Also

आगामी निवडणुकीतही आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करा -दयानंद सोपटे

तळोजा ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आपण आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर विश्वास …

Leave a Reply