Breaking News

रायगड पोलीस भरतीमधील बोगसगिरी उघडकीस

चार उमेदवारांना ठोकल्या बेड्या

अलिबाग : प्रतिनिधी
रायगड पोलीस दलात झालेल्या भरतीमधील बरेगसगिरी उघड झाली आहे. भरती प्रक्रियेत चार उमेदवारांनी बोगस प्रमाणपत्र सादर केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या चारही उमेदवारांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी काही नावे पुढे येण्याची शक्यता आहे.
रोहित बबन मगर (रा. सोलापूर), केशव गिरजाजी मुरमुरे (रा. नांदेड), गोविंद सुखदेव ठाणगे (रा. बीड) आणि अच्युत भागवत माने (रा. बीड) अशी बोगस प्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांची नावे आहेत. राज्यात शासनाने पोलीस भरती प्रक्रिया राबवली. रायगड पोलीस दलात 272 जागांसाठी डिसेंबर महिन्यात भरती प्रक्रिया सुरू झाली होती. हजारो उमेदवारांनी या भरती प्रक्रियेत सहभाग घेतला होता. मैदानी चाचणी, लेखी परीक्षेमध्ये पात्र झालेल्या 272 जणांची अंतिम यादी पोलीस प्रशासनाने जाहीर केली होती. या भरतीत प्रकल्पग्रस्तांसाठीही राखीव जागा असल्याने प्रकल्पग्रस्त उमेदवार भरतीत उतरले होते.
दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यात पोलीस भरतीत बोगस प्रमाणपत्र प्रकरण समोर आले होते. यामध्ये अलिबागमधील पोलीस शिपायाला अटक झाली होती. त्यामुळे प्रकल्पग्रस्त पात्र उमेदवारांचे प्रमाणपत्र तपासणीसाठी रायगड पोलिसांनी बीड, सोलापूर, नांदेड आणि इतर ठिकाणी आपले पथक पाठवून माहिती गोळा केली. या माहितीत रोहित बबन मगर, केशव गिरजाची मुरमुरे, गोविंद सुखदेव ठाणगे व अच्युत भागवत माने या चौघांनी बोगस प्रमाणपत्र देऊन शासकीय नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केल्याची बाब समोर आली.
या चौघांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम 420, 467, 468, 471, 34 प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोगस प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र कोणी दिले? यासाठी किती रक्कम दिली? याबाबत पुढील तपास अलिबाग पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक दत्तात्रय जाधव करीत आहेत.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply