Breaking News

लोकांचे सहकार्य हवे

भारतात रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण इतके प्रचंड का आहे, या प्रश्नाचे अर्धेअधिक उत्तर देशातील अलीकडच्या तीन मोठ्या रस्तेअपघातांच्या तपशीलांत मिळून जाते. काहीही घडले की सरकारकडे बोट दाखवायचे हा विरोधीपक्षांच्या दैनंदिन कामकाजाचा भाग आहे, परंतु एकीकडे देशातील महामार्गांचे जाळे कैकपटींनी विस्तारत असताना अपघातांचे प्रमाण आटोक्यात येत नसेल तर या अपघातांच्या तपशीलांत जाऊन पहावे लागेल व त्यांच्या मुळाशी असलेल्या कारणांवर उपाययोजना करावी लागेल.

समृद्धी महामार्गावरील दुर्दैवी अपघाताची घटना ताजी असतानाच धुळे जिल्ह्यात मंगळवारी सकाळी भरधाव कंटेनरच्या धडकेत दहा जणांचा जागीच मृत्यू झाला व 19 जण जखमी झाले. ब्रेक फेल होऊन चालकाचा ताबा सुटल्याने हा कंटेनर एक कार व अनेक दुचाकींना धडक देत रस्त्याकडेच्या हॉटेलमध्ये शिरला तसेच शेजारच्या बसथांब्यावर जाऊन धडकला. या भीषण अपघातात पाच पुरुष, दोन महिला व तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. ज्या दिवशी महाराष्ट्रात हा अपघात झाला, त्याच 24 तासांत उत्तर प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतही भीषण अपघातांची नोंद झाली. उत्तर प्रदेशात आग्रा जिल्ह्यात सोमवारी रात्री एका भरधाव मोटारीने प्रमाणाबाहेर प्रवासी कोंबलेल्या ऑटोरिक्शाला धडक दिल्याने सहा जण ठार झाले तर तीन जण गंभीर जखमी झाले. मोटारचालकाने मद्यप्राशन केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. तिसर्‍या अपघातात हैदराबादमध्ये मॉर्निंग वॉकला निघालेल्या तिघी जणींना एका भरधाव मोटारीने पाठीमागून जोरदार धडक दिली. एक 19 वर्षांचा तरुण ही मोटार भीषण वेगाने चालवत होता. गेल्या नऊ वर्षांत देशातील राष्ट्रीय महामार्गांची एकूण लांबी सुमारे 59 टक्क्यांनी वाढली आहे. या वाढीमुळे भारताकडे आता अमेरिकेनंतर दुसर्‍या क्रमांकाचे सर्वांत मोठे रस्ते जाळे झाल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच सांगितले होते. शाश्वत भविष्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याने पुढील पाच वर्षांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवणे, स्वच्छ ऊर्जेला चालना देणे आणि कार्बन उत्सर्जन कमी करणे यावर भर देणार असल्याचेही ते नेहमी सांगतात, मात्र रस्ते अपघात कमी करण्याच्या संदर्भात झालेल्या कामाबाबत आपण फारसे समाधानी नसल्याची खंतही गडकरी आवर्जून व्यक्त करतात. मानवी वर्तणूक हा अपघात कमी करण्यातील महत्त्वाचा घटक असून मानवी वर्तणुकीत बदल घडून आल्याखेरीज रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण कमी होणार नाही व लोकांच्या सहकार्याशिवाय हे शक्यही नाही याची कबुली त्यांनी यापूर्वी अनेकदा दिली आहे. स्वयंसेवी व सामाजिक संघटना, विद्यापीठे, महाविद्यालये, शाळा यांच्यामार्फत मोठी मोहीम चालवून यासंदर्भात लोकांचे सहकार्य मिळवण्याचा प्रयत्न परोपरीने सुरू आहे. नेमके कुठे हवे आहे लोकांचे सहकार्य? आपल्याकडील अपघातांची कारणमीमांसा करताना नेहमी जाणवते की आपली बेशिस्त आणि बेदरकार वृत्ती त्यापैकी बहुतेक अपघातांस कारणीभूत असते. अपघातांमागे यांत्रिक दोष कमी प्रमाणात दिसतात व मानवी चुकीचे प्रमाण त्यापेक्षा कितीतरी अधिक असते. भारतात रस्ते अपघातांत दरवर्षी साधारणपणे दीड लाख लोक आपला जीव गमावतात. हे प्रमाण जगातील ज्या-ज्या देशांमध्ये कमी आहे, तिथे अपघात होऊच नयेत यासाठी उत्तम खबरदारी घेतली जाते. नियम हे आपल्या सुरक्षेसाठी आहेत याची भावना तेथील नागरिकांमध्ये नीट रुजलेली दिसते. आपल्याकडेही ही भावना रुजवण्यावर आता भर दिला जायला हवा.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply