Breaking News

अमेरिकेची इराणला धमकी

नवी दिल्ली ः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला निर्वाणीचा इशारा दिला आहे. इराणने अमेरिकेच्या हितावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तर इराणला नष्ट करू, अशी धमकीच ट्रम्प यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. इराणला लढायचे असेल तर त्यांचा शेवट करू. पुन्हा अमेरिकेला धमकी देण्याची हिंमत करू नका, असे ट्रम्प यांनी खडसावले आहे. या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवसांत अमेरिका आणि इराणमधील तणाव आणखी वाढू शकतो. अमेरिकेने आखाताच्या समुद्रात आपल्या युद्धनौका आणि बी-52 बॉम्बर विमाने तैनात केली आहेत. इराणचे समर्थन असलेल्या सशस्त्र इराकी गटांकडून धोका असल्यामुळे ट्रम्प प्रशासनाने अनावश्यक राजनैतिक कर्मचारी वर्गाला इराक सोडण्यास सांगितले आहे.

कमलनाथ सरकार अल्पमतात

नवी दिल्ली ः लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा शांत झाला असतानाच एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. 23 मे रोजी येणार्‍या निकालाआधीच या एक्झिट पोलमधून मोदी पुन्हा पंतप्रधान होणार असल्याचे दाखवण्यात आले आहे. यादरम्यान मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार अल्पमतात असल्याचा दावा केला जात आहे. भाजप नेते गोपाल भार्गव यांनी राज्यपालांना चिठ्ठी लिहून विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. गोपाल भार्गव म्हणाले, केंद्र व राज्यात भाजपला जबरदस्त जनाधार मिळाला, तसेच काँग्रेसचे अनेक आमदार कमलनाथ सरकारला वैतागले आहेत. त्यांना भाजपमध्ये प्रवेश हवा आहे.  काँग्रेसच्या त्या आमदारांना कमलनाथ सरकारबरोबर काम करायचे नाही. त्यामुळे राज्यपालांनी विशेष अधिवेशन बोलवावे. कारण जनता आता त्यांना पूर्णतः नाकारत आहे. हे सरकार आपल्या कर्माने जाणार असल्याचेही भार्गव म्हणाले.

जवानास मारहाण

मुंबई ः टिळकनगर रेल्वे स्थानक परिसरातील तिकीटघराजवळ दुचाकी लावण्यास विरोध केला म्हणून महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान शंकर आव्हाड (30) यांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे. या प्रकरणी नेहरूनगर पोलिसांनी अब्दुल कादीर अब्दुल अजिज अन्सारी (31) आणि इरफान अब्दुल अजिज अन्सारी (28) या दोघांना अटक केली आहे. आव्हाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार टिळकनगर स्थानकात शुक्रवारी कर्तव्यावर असताना येथील तिकीटघराजवळ अब्दुल दुचाकी लावताना दिसला. आव्हाड यांनी त्याला विरोध केला असता रागात अब्दुलने त्यांचा गळा पकडत शिवीगाळ केली. त्यानंतर त्याचे आणखी तीन साथीदार तेथे धडकले. त्यांनी त्यांना मारहाण सुरू केली. यात इरफानचाही समावेश होता. आरोपींमधील इरफान हा वकील, तर अब्दुल रेल्वेत नोकरीला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती नेहरूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास शिंदे यांनी दिली.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply