Breaking News

महाविकास आघाडीला धक्के

महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापती असलेल्या ठाकरे गटाच्या नेत्या निलम गोर्‍हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेते प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार व सहकारी राज्य सरकारमध्ये सहभागी झाल्याने शिंदे समर्थक नाराज होऊन ठाकरे गटात परततील अशी अटकळ बांधली जात असताना प्रत्यक्षात मात्र उलटेच घडत आहे. यानिमित्ताने ठाकरे गटासह महाविकास आघाडी आणखी कमकुवत होत असल्याचे चित्र दिसत आहे.
वषभरापूर्वी शिवसेनेचे वरिष्ठ नेेते एकनाथ शिंदे आणि सहकारी आमदारांनी उठाव करीत भाजपसोबत सरकार स्थापन केले आणि राज्यात युतीचे राज्य अस्तित्वात आले. खरेतर राज्यातील जनतेने भाजप-शिवसेना युतीलाच कौल दिला होता, पण मुख्यमंत्रिपदाच्या मोहापायी उद्धव ठाकरे यांनी भाजपला एकटे टाकून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली आणि या आघाडी सरकारचा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. त्यांनी अडीच वर्ष कारभार केला. या अडीच वर्षांत राज्याची प्रचंड अधोगती झाली. मुख्यमंत्री महाशय घरात बसून राज्यकारभार पाहत असल्याने दुसरे काय होणार? स्वत:ची खुर्ची सांभाळण्यासाठी त्यांनी पक्षाचा बळी दिला. अखेर शिवसेनेची होणारी फरपट सहन न झाल्याने एकनाथ शिंदे यांनी सहकारी आमदारांसह उठाव केला. तेव्हा शिवसेनेसह महाविकास आघाडीला पहिला हादरा बसला. एकीकडे भाजप-शिवसेना युतीचे सरकार मजबुतीने पुढे जात असताना दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता सुरू झाली. वरकरणी ही मंडळी आम्ही एकत्र असून अभेद्य असल्याचे दाखवित असली तरी वज्रमूठ हळूहळू सैल होत होती. मानापमानाचे प्रयोग रंगत होते. खटके उडत होते. हे सारे जेव्हा सहन करण्याच्या पलीकडे गेले तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनीही राज्यातील सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यांना उपमुख्यमंत्रीपद, तर इतर नऊ जणांना मंत्रीपद देण्यात आले. देशाच्या प्रगती आणि विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही, असे अजितदादांचे ठाम म्हणणे आहे. म्हणूनच विकासाच्या मुद्द्यावर आम्ही सरकारमध्ये दाखल झालो असल्याचे ते सांगतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत सहभागी झाल्याने शिवसेनेतील नेते नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या. काही नेते घरवापसी करतील, असाही आडाखा बांधला जाऊ लागला, पण बुडत्या जहाजात कोण जाईल? उलट ठाकरे गटातील नेते आमच्या संपर्कात असून ते लवकरच शिवसेनेत दाखल होतील, असे मंत्री उदय सामंत यांनी म्हटले होते. त्याची सुरुवात दुसर्‍याच दिवशी निलम गोर्‍हे यांच्या पक्षप्रवेशाने झाल्याचे दिसून येते. अलिकडेच मनीषा कायंदे यांनीही शिंदेचे नेतृत्व स्वीकारलेे. मध्यंतरी ठाकरे गटात सुषमा अंधारे यांची अचानक एण्ट्री झाली. मागून आलेल्या अंधारेंना महत्त्व दिले जात असल्याने एवढी वर्षे पक्ष संघटनेसाठी कार्यरत असणार्‍या महिला नाराज झाल्या आहेत. त्यातूनच आधी कायंदे व आता गोर्‍हे यांनी ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ केल्याचे बोलले जात आहे. शिवसेना, राष्ट्रवादी फुटल्यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षातही फूट पडेल, असा दावा शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. सामंत यांच्याप्रमाणे शिरसाट यांचेही म्हणणे खरे ठरणार का? हे येणारा काळच सांगेल. एवढे मात्र नक्की की महाविकास आघाडीला एकामागोमाग एक धक्के बसत असून ही आघाडी बॅकफूटवर गेली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये सत्ताधार्‍यांशी लढण्याआधी त्यांनाच एकमेकांचा आधार घ्यावा लागणार आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply