खोपोली : प्रतिनिधी
खालापूर तालुक्यातील ढेकू औद्योगिक वसाहतीतील पालको या कारखान्यातील कामगार व व्यवस्थापनाचे स्नेहसंमेलन सोमवारी (दि. 6) उत्साही वातावरणात साजरे झाले. या कार्यक्रमात कामगार, अधिकारी व मालक आपल्या कुटुंबासह सहभागी झाले होते.
या स्नेहसंमेलनत सर्वजण मतभेद विसरून वैचारिक देवाणघेवाण करतात. त्यामुळे कामगार व व्यवस्थापन यामधील दरी कमी होऊन, कारखान्यात उत्पादन वाढीच्या दृष्टीकोनातून उत्तम वातावरण टिकून राहील, असे मत जनकल्याण समितीचे जिल्हा कार्यवाह नितीन भावे यांनी यावेळी व्यक्त केले.
प्रारंभी व्यवस्थापनातर्फे मुख्य प्रबंधक राकेश पाठक यांनी कंपनीचे संचालक सुशांत बन्सल यांचे स्वागत केले. या कार्यक्रमाला कंपनीचे वितरक देवेंद्र जाखोटिया, उद्योजक निकम, ज्येष्ठ पत्रकार जयवंत माडपे, कारखान्याच्या मुंबई कार्यालयातील वरिष्ठ व्यवस्थापक गुलाबभाई गुप्ता, रा. स्व. संघ तालुका कार्यवाह प्रा. अविनाश मोरे, जिल्हा महामार्ग प्रमुख रोहित कुलकर्णी, दीपक कुवळेकर, गौरव तटकरे, नरेंद्र मेघवाल, गोखले यांच्यासह परिसरातील उद्योजक उपस्थित होते. पांडू लोहार, गणेश मोरे, व ठाकूर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यालय प्रमुख विमल घोसाळकर व त्यांच्या सहकार्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले. महाप्रसादानंतर कार्यक्रमाची समाप्ती झाली.