पावसाळ्यात पुरेल इतके धान्य प्रशासनाकडून उपलब्ध
अलिबाग : प्रतिनिधी
पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे दुर्गम गावातील नागरिकांची अन्नधान्याअभावी आबाळ होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने गावातील कुटुंबांना सप्टेंबर महिन्यापर्यंत पुरेल इतके धान्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. जिल्ह्यात दोन हजार क्विंटल गहू आणि पाच हजार क्विंटल तांदळाचा पुरवठा करण्यात आला आहे.
दुर्गम डोंगराळ भागात वसलेल्या गावात पावसाळ्याच्या दिवसांत वाहतूक व्यवस्था बंद असते. कधी कधी अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांना पूर येऊन अशा गावांचा बाजारपेठांशी संपर्क तुटतो. अशावेळी त्यांना पुरेसे अन्नधान्य उपलब्ध व्हावे यासाठी पावसाळ्यापूर्वीच त्या गावात धान्याचा पुरेसा साठा करून ठेवण्यात येतो. पावसाळा संपेपर्यंत पुरेल इतका धान्यसाठा उपलब्ध करून दिला जातो. रायगड जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यातील दुर्गम डोंगराळ भागात आदिवासी समाजाची वस्ती आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला भात लागवडीची कामे संपल्यानंतर त्यांना साधारण दसर्यापर्यंत रोजगार उपलब्ध नसतो. अशावेळी या कुटुंबांचे अन्न्धान्याअभावी कुपोषण होऊ नये यासाठी राज्य सरकारने नवसंजीवनी योजना सुरू केली आहे. त्यानुसार पावसाळा सुरू होण्यापूर्वी या कुटुंबांना धन्याचा पुरवठा केला जातो.
या वर्षी रायगड जिल्हयात अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेतंर्गत अशा प्रकारे धान्याचा पुरवठा करण्यात आला आहे. यामध्ये महाड तालुक्यातील सर्वाधिक 16 गावांचा समावेश आहे. त्या खालोखाल पेण तालुक्यात 14 गावांमध्ये धान्यपुरवठा करण्यात आला आहे. उरण तालुक्यातील घारापुरी बेटावरील नागरिकांनादेखील ऑगस्ट अखेर पुरेल इतके धान्य वितरीत करण्यात आले आहे. कर्जतमधील माथेरान, सुधागडमधील सिद्धेश्वर खुर्द, उसर तर रोह्यातील पांगळोली कालकाई ही गावे या योजनेत समाविष्ट असून त्यांनादेखील तीन महिन्यांच्या धान्याचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे
यांनी दिली.