‘जैत रे जैत’नंतर कवी ना. धों. महानोर गीतकार म्हणून प्रसिद्ध झाले. साहित्यिक वर्तुळात त्यांच्या नावाचा दबदबा निर्माण झाला. अनेक पुरस्कार, साहित्यसंमेलनांतील सहभाग हे सारेही त्यांच्या वाट्याला आले. इतकेच नव्हे, तर ते विधान परिषदेचे सदस्यही बनले, पण तरीही अखेरपर्यंत हा शेतकरी-कवी मनापासून शेतीतच रमलेला राहिला.
महानोर गेले. गुरुवारी सकाळीच बातमी आली. कालपरवापर्यंत कुठल्याशा मुलाखतीत, अन्य कुठल्या निमित्ताने आपली एखादी लय-नाद यांनी लुभावणारी कविता ऐकवताना दिसणारे निसर्गकवी ना. धों. महानोर असे इतक्यात अकस्मात जातील असे ध्यानीमनी नसताना ही बातमी आली आणि अनेकांच्या मनात त्यांच्या गीतांनी दिलेल्या अपार आनंदाच्या स्मृती जाग्या झाल्या. महानोरांनी मोजक्याच चित्रपटांसाठी गाणी लिहिली, पण त्यातली कित्येक आजही लोकप्रिय आहेत. बहुतेक सर्वसामान्य संगीतप्रेमींच्या मनात त्यांचे नाव कायमस्वरुपी कोरले गेले ते ‘जैत रे जैत’ या चित्रपटातील अजरामर गाण्यांमुळेच. ‘असं एखादं पाखरू वेल्हाळ’, ‘नभ उतरू आलं’, ‘मी रात टाकली, मी कात टाकली’ या गाण्यांपैकी कुठलेही गाणे आजही ऐकले तरी तितकेच मोहवून टाकते. या गाण्यांनीच खरे तर अनेकांना या निसर्गकवीच्या कवितांकडे वळवले. ‘रानातल्या कविता’ असे त्यांच्या एका कवितासंग्रहाचे शीर्षक आहे. त्यांच्या कवितांना खरोखरीच रानातल्या मातीचा, वार्याचा, पाल्यापाचोळ्याचा गंध होता आणि तोच असंख्य कविताप्रेमींना मोहवत राहिला. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले की मला माझे शेत अखेरचे एकदा दाखवा, अशी अंतिम इच्छा त्यांनी शेवटच्या दिवसांत व्यक्त केली होती, पण दुर्दैवाने ती पूर्ण होण्याआधीच पुणे शहरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शेती आणि वाचन या दोन्ही गोष्टी सारख्याच निष्ठेने करण्यातून साकारलेला महानोरांसारखा साहित्यिक विरळाच असावा. ‘पळसखेड’ या त्यांच्या गावाच्या नावातही एक नाद जाणवतो हाही एक दैवयोगच. आपल्या शेतशिवारातील निसर्गाशी एकरूप झाल्यानेच त्यांच्या गीतांच्या, कवितांच्या शब्दाशब्दांतून निसर्ग अविभाज्य भाग होऊन सहजपणे अवतरला. ‘या नभाने या भुईला दान द्यावे, आणि या मातीतूनी चैतन्य गावे, कोणती पुण्ये अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लखडून जावे…’
या अशा त्यांच्या कवितांमधील निसर्गप्रतिमांची मोहिनी शहरी साहित्यरसिकांच्या मनावर कायमचे गारुड करून गेली. जे या शहरी जीवांना प्रत्यक्ष्यात फार क्वचित अनुभवायला मिळत होते किंवा अनुभवल्यावरदेखील ज्याची अभिव्यक्ती कठीण वाटली असती, ते सुख महानोरांच्या शब्दकळेने त्यांना अनुभवता आले. एका पिढीचे निसर्गभानच त्यांच्या कवितांनी जागविले, जपले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. महानोरांच्या कवितांवर कुठल्याही पूर्वकालीन वा समकालीन कवींचा प्रभाव दिसत नाही असे उल्लेख समीक्षकांच्या लिखाणात आढळतात, तर काही जणांना त्यांची कविता थेट बहिणाबाईंच्या ओव्यांशी नाते सांगणारी वाटते. त्यांच्या कवितेतील उत्स्फूर्तता, आपल्या मातीशी, बोलीभाषेशी असलेली जवळीक जपत अवतरणारी त्यांची कविता म्हणूनच थेट मंगेशकर कुटुंबीयांनाही मनोमन आवडली आणि अवघ्या महाराष्ट्राला आगळ्या प्रतिभेचा हा निसर्गकवी अखेरपर्यंत आपलासा वाटत राहिला. त्यामुळेच गुरुवारी महानोरांच्या निधनाची बातमी येताच अनेकांनी समाजमाध्यमांवर त्यांच्या गाण्यांच्या, कवितांच्या ओळींमधून त्यांच्याविषयीची प्रेमादराची भावना व्यक्त केली. ‘या शेताने लळा लावला असा असा की’… म्हणत तमाम मराठीजनांना आपल्या कवितेचा लळा लावणारा हा कवी आता काळाच्या पडद्याआड निघून गेला असला तरी त्यांची शब्दलेणी कविताप्रेमींना लुभावतच राहणार आहेत.