Breaking News

विमानतळाच्या तीन प्रमुख मार्गांवर 9 ऑगस्टला लोकनेते दि. बा. पाटील नामफलक लावणार

सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत निर्णय

पनवेल ः प्रतिनिधी
लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने 9 ऑगस्ट रोजी नवी मुंबई विमानतळावर जाण्यासाठी असलेल्या तीन प्रमुख मार्गांवर नामफलक लावण्याचा निर्णय घेतला आहे. या विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा जो ठराव राज्य सरकारने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर केला आहे, त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्य सरकारने तो त्वरित केंद्र सरकारकडे पाठवून मंजूर करून घ्यावा, अशी कृती समितीची मागणी आहे.
या संदर्भात आगरी समाज मंडळाच्या पनवेल येथील महात्मा ज्योतिबा फुले सभागृहात गुरुवारी (दि. 3) लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीची बैठक झाली. या बैठकीस समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, जे. डी. तांडेल, अतुल पाटील, विनोद म्हात्रे, संतोष केणे, गजानन पाटील, राजेश गायकर, विजय गायकर, दीपक पाटील, शैलेश घाग, प्रताप पाटील, नितेश वैती, रघुनाथ पाटील, सुभाष पाटील, मधुकर पाटील, प्रकाश पाटील, रवींद्र वाडकर आदी उपस्थित होते.
राज्य सरकार ‘दिबां’च्या नावासाठी सकारात्मक असल्याने तो प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवून त्याचा पाठपुरावा केला जाईल, असा विश्वास व्यक्त करून येत्या 9 ऑगस्टला विमानतळावर जाण्यासाठी असलेल्या तीन प्रमुख मार्गांवर लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाचे फलक लावण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले. खारघर, चिंचपाडा आणि बंबावीपाडा उरण बायपास रोड येथे हे फलक लावण्यात येणार आहेत. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह सर्व प्रमुख नेते व हजारोंच्या संख्येने भूमिपुत्र उपस्थित राहणार असल्याचे कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी सांगितले.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply