Breaking News

समाजहितैषी!

समाजसेवी व्यक्तिमत्त्वं जसजशी वयाने, ज्ञानाने आणि अनुभवाने मोठी होत जातात तशा त्यांच्या सामाजिक जाणिवादेखील वृद्धिंगत होत असतात. पनवेलचे कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे पाहिल्यावर याची मनोमन साक्ष पटते. जनहिताचा कळवळा आणि विकासाची तळमळ असलेल्या या नेत्याने आपल्या अथक कार्यातून पनवेलसह रायगड जिल्ह्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे…

जनमानसात आदराचे स्थान असलेले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा समाजकारणाचा वसा अन् वारसा आमदार प्रशांत ठाकूर नेटाने पुढे चालवत आहेत. पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरीकरण होऊन सोयीसुविधांवर ताण पडत असल्याने त्यांनी पनवेल नगर परिषदेची महानगरपालिका व्हावी, अशी मागणी राज्य शासनाकडे केली होती. यासाठी त्यांनी पाठपुरावाही केला. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन पनवेल हे नगरातून महानगरात रूपांतरित झाले. गतवर्षी या महापालिकेने पहिली टर्म पूर्ण केली. आजही ही पालिका प्राथमिक स्थितीत असल्याने तिची घडी व्यवस्थित बसावी यासाठी एकीकडे शासनाकडून वेगवेगळ्या योजना, निधी मंजूर करून घेणे, तर दुसरीकडे स्थानिक पातळीवर कामांची सांगड घालत समतोल व सुयोग्य विकास साधण्याकडे आमदार प्रशांत ठाकूर यांचे विशेष लक्ष आहे.
गजबजलेल्या पनवेल शहरात नागरिकांना निवांतपणे फिरता, वावरता यावे यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने वडाळे तलावाचे सुशोभीकरण करण्यात आले. आज हा सर्वांगसुंदर तलाव परिसर पनवेलच्या सौंदर्यात भर घालत असून सर्वांसाठी एक आनंददायी ठिकाण बनले आहे. एरवी शांत असलेले आमदार प्रशांत ठाकूर जनतेच्या प्रश्नांवर मात्र आक्रमक होतात. जे लोकांच्या हक्काचे आहे ते त्यांना मिळालेच पाहिजे यासाठी ते आग्रही असतात. अनेकदा त्याचा प्रत्यय येतो. मध्यवर्ती असलेल्या पनवेल बस आगाराच्या पुनर्विकासाचे काम मागील काही वर्षांपासून रेंगाळले आहे. ते मार्गी लागून प्रवाशांना दिलासा मिळावा याकरिता स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी अनेकदा पत्रव्यवहार, बैठका, आंदोलन केली, मात्र तरीही काम सुरू करण्यास ठेकेदाराकडून चालढकल होत असल्याने नुकतीच त्यांनी मंत्रालयात राज्य परिवहन महामंडळाचे प्रधान सचिव यांच्या दालनात बैठक बोलावली होती. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी परिवहन सचिवांना पनवेल एसटी बसस्थानकाची झालेली दुरवस्था निदर्शनास आणून दिली आणि हे काम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी ठेकेदाराला आदेशित करावे; अन्यथा त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली. ती मान्य करीत लवकरच या संदर्भात कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. अशाच प्रकारे पनवेलमधील विद्युत समस्यांवर त्यांनी महावितरणसोबत बैठक घेऊन नागरिकांना सुरळीत वीजपुरवठा करावा, असे अधिकार्‍यांना निर्देशित केले. त्यानुसार वीजविषयक तक्रारींची सोडवणूक करण्यासाठी दर महिन्याचा पहिला सोमवार हा महावितरण लोकशाही दिन असेल असे या वेळी ठरले. याच विषयाला अनुसरून पनवेल महापालिका क्षेत्रातील वीजवाहिन्या भूमिगत करण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी नुकत्याच झालेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केली. त्यावर उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी आवश्यक तो निधी देणार असल्याचे सांगितले. अशा प्रकारे पनवेलचे प्रश्न सुटून येथील नागरिकांना विविध सेवा, सुविधा मिळाव्यात यासाठी आमदार प्रशांत ठाकूर दक्ष असतात हे दिसून येते.
सातत्याने कार्यमग्न असलेल्या आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे लोकांचा राबता असतो. सकाळी लवकर उठून ते आपल्या दैनंदिन कामाला सुरुवात करतात. घरी आलेल्या लोकांच्या समस्या, अडचणी जाणून घेणे, दिवसभर विविध कार्यक्रमांनिमित्त दौरे, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका, भेठीगाठी असे त्यांचे वेळापत्रक अतिशय व्यस्त असते. त्यांनी भाजपच्या रायगड जिल्हा अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. पक्षाचे संघटन जिल्ह्यात मजबूत केले. त्यामुळे त्यांच्यावर आता मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. साहजिकच त्यांचा व्याप आणखी वाढला आहे. तरीही अतिशय उत्साहाने व ऊर्जेने ते रात्रीपर्यंत कार्यरत असतात. हा प्रचंड लोकसंपर्क त्यांच्या यशाचे गमक असावे.
एक संवेदनशील लोकप्रतिनिधी म्हणूनही आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे पाहिले जाते. नागरिकांवर ओढावलेले कुठलेही संकट असो वा नैसर्गिक आपत्ती हा लोकप्रतिनिधी नेहमीच मदतीला धावून जातो. पनवेलमधील पूर, महाडमधील सावित्री नदीपूल दुर्घटना, जलप्रलय, तळीये येथे दरड कोसळून उद्भवलेली परिस्थिती, महाभयंकर कोरोना महामारी अशा सर्व बिकट परिस्थितीत त्यांनी नागरिकांना शक्य ती मदत करून धीर दिला. काही दिवसांपूर्वी खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीत दरड कोसळल्यानंतरही ते दुसर्‍याच दिवशी घटनास्थळी पोहचले होते. सुखात सर्वच सहभागी होत असतात, पण हा नेता दुःखद प्रसंगीही आवर्जून उपस्थित असतो. त्यामुळेच नागरिकांना त्यांचा मोठा आधार वाटतो.
उत्तुंग विकासकामांच्या जोरावर पनवेल विधानसभा मतदारसंघात सलग तिसर्‍यांदा विजय मिळवून आमदार प्रशांत ठाकूर यांनी हॅट्ट्रिक साधली आहे. एवढे यश मिळवूनही त्यांचे पाय जमिनीवर आहेत. प्रसिद्धीपराङ्मुख हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य. अशा या शांत, संयमी, विनम्र आणि अभ्यासू नेत्याला वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
-समाधान पाटील, पनवेल (मोबाईल 9004175065)

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply