नवी मुंबई : बातमीदार
नवी मुंबईतील नेरूळ स्थानकाची पश्चिम बाजू म्हणजे अनधिकृत खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सचा अड्डा झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. स्थानकातील बाहेरची बाजू सिडकोने दुकानदारांना भाड्याने व्यवसायासाठी दिलेली आहे, परंतु स्थानकात शिरतानाच येणार्या जाणार्या प्रवाशांना आपण एखाद्या खाऊ गल्लीत आलो की काय असा भास होतो. एवढा विळखा या अनधिकृत खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सचा स्थानकाला पडलेला आहे.
स्टॉल्सव्यतिरिक्त प्रत्येक दुकानदारांनी आपल्या समोरची जागा बाळकावलेलीच आहे. प्रत्येक दुकानदाराचे खाद्य पदार्थांचे सामान अक्षरशः स्थानकात जाणार्या रस्त्यातच मांडलेले आहे. त्यामुळे दुकानांसमोर खवय्यांची गर्दी होत असली तरी त्या गर्दीचा त्रास स्थानकातून प्लॅटफॉर्मवर ट्रेन पकडण्यासाठी धावपळ करणार्या नागरिकांना होत आहे. सकाळी सुरू झालेली ही दुकाने आणि स्टॉल्स रात्री उशिरापर्यंत चालू असतात. यावर कोणत्याच नियमांचे बंधन नसल्याचे दिसून येते. रेल्वेस्थानके सिडको अंतर्गत येत असल्याने सिडकोच्या सुरक्षा रक्षकांचा आशीर्वाद या दुकानदारांना मिळू लागल्याचे दिसून येत आहे.
या दुकानदार आणि स्टॉल्सधारकांकडून कसलीही ठेवली जात नाही कुठेही खाऊन झालेल्या प्लेट्स आणि सरबतांचे ग्लासेस पडलेले आढळतात. तळल्या जाणार्या चायनीज पदार्थांतुन निघणार्या धुरामुळे येथून चालताना गुदमरल्यासारखे होते किंवा खोकल्याची उबळ येते. खाऊन झाल्यावर हात धुवायला स्थानकामध्ये जागा नसल्यामुळे खाऊन झाल्यावर प्रत्येकजण तेथेच हात धुतो. अशाने पाणी साठून दुर्गंधी ही पसरलेली आहे. त्यामुळे नवी मुंबईतील या स्वछ स्थानकाला उकीरड्याचे आणि काहीसे गटाराचे स्वरुप प्राप्त झालेले आहे.
नवी मुंबईतील स्थानके ही मुंबईतील स्थानकांपेक्षा प्रशस्त आणि स्वच्छ समजली जातात, पण सध्याच्या अशा स्थानकांच्या गलीच्छपणामुळे नागरिकांना मुंबईतील स्थानकांत आल्याचा भास होत आहे. सिडकोचे अतिक्रमण पथक येणार असल्यास आधीच या दुकानदारांना आणि अनधिकृत स्टॉल्सधारकांना भेटीची कल्पना दिली जाते आणि मग काही काळ स्थानक अगदी स्वच्छ होते, परंतु अधिकारी येऊन गेले की पुन्हा जैसे थे परिस्थिती तयार होते.
- रस्ता अडवून भाजी विक्री
रात्री तर येथील स्थानकाचे भाजी मंडईमध्ये रूपांतर झाल्याचे पाहायला मिळत आहे. हे भाजी विक्रेते अक्षरशः स्थानकाच्या आत तसेच पादचारी पुलावर जाऊन आणि येणारा जाणारा रस्ता अडवून भाजी विकत असल्याचे चित्र पाहायला मिळते. यामुळे कित्येकवेळा प्रवाशांना अगदी नागमोडी वळणे घेऊन वाट काढून स्थानकातून बाहेर पडावे लागत आहे. तसेच ही भाजी विकून झाल्यावर उरला सुराला कचरा तिथेच टाकून दिला जातो. खाद्यपदार्थ विक्रेतेही कचरा तिथेच टाकत असल्यामुळे अगदी किळसवाणी घाण या स्थानकात पाहायला मिळत आहे. त्यामुळे नवी मुंबईतील या सुंदर रेल्वे स्थानकाकडे खरोखर लक्ष देणे गरजेचे बनलेले आहे. - पालिकेला स्वच्छतेत सहकार्य नाहीच
नेरूळ रेल्वे स्थानकाला भिकार्यांनी घेरले रहशा दिवसभर हे भिकारी रेल्वे स्थानकात ठाण मांडून असतात. तर रेल्वे स्थानकातील बाह्य भागात अनेक बेघरानी कुटुंबासह राहण्यास सुरुवात केले आहे. एकीकडे पालिका स्वच्छ सर्वेक्षणासाठी सर्व प्राधिकरणाना सहकार्य करण्याचे आवाहन देत असताना रेल्वे स्थानकातील अस्वच्छ तेकडे अतिक्रमणांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरीकांनादेखील जाता येता किळस वाटू लागली आहे.