पनवेल : रामप्रहर वृत्त
खांदा कॉलनी आणि कळंबोली वसाहतीतील अल्प उत्पादन गटातील घरांची अवस्था बिकट आहे. स्लॅब कोसळण्याचा घटना वाढतच चालल्या आहेत. याकडे प्रभाग समिती सभापती संजय भोपी यांनी लक्ष वेधून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा केला. त्याची दखल घेत सिडकोने पुनर्विकासासाठी अनुकूलता दर्शवली आहे.
कळंबोली, नवीन पनवेल आणि खांदा वसाहतीत बांधण्यात आलेल्या सिडको इमारतींच्या बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. स्लॅब कोसळण्यापासून ते प्लास्टर निघणे यासारख्या असंख्य घटना कळंबोलीतील केएल-2 आणि खांदा वसाहतीतील ए टाईपच्या घरांमध्ये घडत आहेत. सिडकोकडून 35 वर्षांपूर्वी या इमारती उभारत असताना त्यांच्या दर्जाकडे लक्ष देण्यात आले नाही. अल्प उत्पादन गटासाठी ए टाईप, बी टाईप, केएल टाईपची घरे बांधली होती. या लहान घरात माथाडी, भाजीविक्रेते, वाहनचालकांनी आपला संसार थाटला, मात्र आजही परिस्थिती अतिशय बिकट आहे.
इमारतींचे बांधकाम मजबूत नसल्याने लवकरच स्लॅब कोसळणे, भिंतीला तडा याव्यतिरिक्त पावसाळ्यात गळती लागणे असे प्रकार सुरू झाले. रहिवाशांनी लेखी, तोंडी तक्रारी केल्या, मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. हे काम संबंधित गृहनिर्माण संस्थांचे असल्याचे सांगत उडवाउडवीचे उत्तर सिडकोकडून दिले गेले. तीच परिस्थिती कळंबोली येथील केएल-2मध्ये आहे. सिडको धोकादायक इमारतींना नोटीस बजावून दुर्घटना घडल्यास आम्ही जबाबदार नाही असे सांगून जबाबदारी झटकत होती. त्यामुळे रहिवाशी जीव मुठीत घेऊन राहतात.
काही महिन्यांपूर्वी खांदा वसाहतीत सेक्टर 8मधील त्रिवेणी संगम सोसायटीतील एका घरात स्लॅब पडला. त्यात एक जण जखमी झाला. असे प्रकार घडत असताना सिडको प्रशासन एखाद्याचा जीव जाण्याची वाट पाहणार आहे का, असा संतप्त सवाल सभापती संजय भोपी यांनी केला होता. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्या ठिकाणी भेट देऊन ए आणि बी टाईपचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याचबरोबर पुनर्विकासाबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचेही निर्देश संबंधित विभागाला दिले होते. त्यानुसार सिडकोने सकारात्मक भूमिका घेतली आहे.
खांदा कॉलनी किंवा कळंबोली नोडमधील सोसायट्यांनी आवश्यक दस्तऐवजांसह विनंती अर्ज सादर केल्यास त्याबाबत उचित कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सिडकोने कळविले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper