अलिबाग : प्रतिनिधी
मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यानची फेरीबोट जलवाहतूक सेवा 1 सप्टेंबरपासून सुरू करण्यास मेरीटाईम बोर्डाने परवानगी दिली आहे. मुंबईला जोडणारा हा सर्वांत जवळचा आणि वेळेची बचत करणारा मार्ग असून वर्षातील तीन महिने ही सेवा बंद असते, त्याचा परिणाम येथील पर्यटन व्यवसायावर जाणवत असतो. त्यामुळे फेरीबोट सेवा कधी सुरू होणार याकडे येथील प्रवाशांसह पर्यटन व्यावसायिकांचे लक्ष असते.
नऊ महिने अलिबाग मांडवा ते गेटवे, गेटवे ते अलिबाग मांडवा असा प्रवास बोटीने प्रवास करणार्यांची संख्या मेरीटाईम बोर्डाच्या माहितीनुसार 15 लाखांच्या आसपास आहे. या जलमार्गावरून पीएनपी, मालदार, अजंठा, अपोलो या कंपन्यांच्या प्रवासी बोटी सुरू असतात. दर अर्ध्या तासाने एक फेरीबोट मांडवा बंदरातून सुटते. गर्दीच्या वेळेला ही सरासरी वाढवली जाते. स्पीडबोट, रो-रो पेक्षा फेरीबोटीचा प्रवास सर्वसामान्यांना परवडणारा आहे. त्यामुळे प्रवासी फेरीबोटीचा वापर जास्तीत जास्त केला जात आहे.
1 सप्टेंबरपासून मांडवा ते गेटवे ऑफ मुंबई हा मार्ग मध्यम आकाराच्या फेरीबोटींसाठी खुला होणार आहे. खराब हवामानाचा जोपर्यंत अडथळा निर्माण होत नाही तोपर्यंत या मार्गावर दिवसा जलवाहतूक सुरू राहिल. फेरीबोट सुरू करण्यापूर्वी त्यांची डागडुजी, सुरक्षा साधनांची तपासणी करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
-कॅप्टन सी.जे. लेपांडे, प्रादेशिक बंदर अधिकारी, रायगड