Breaking News

मलेरिया, डेंग्यू रोखण्यासाठी एकत्रित काम करण्याची गरज

आमदार प्रशांत ठाकूर यांचे पनवेल मनपाच्या बैठकीत आवाहन

पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात मलेरिया, डेंग्यू रोगाविषयी सर्वसामान्यांना माहिती देऊन या रोगाचा प्रसार थांबविण्यासाठी पालिकेबरोबर खासगी प्रॅक्टिशनर, लॅब, सर्वांनी एकत्रित येऊन काम करण्याची गरज असल्याचे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.
आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात किटकजन्य आजाराच्या नियंत्रणासाठी शुक्रवारी (दि. 22) झालेल्या या बैठकीत आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा हिवताप अधिकारी राजाराम भोसले, डॉक्टर संघटनेचे डॉ. गिरीश गुणे, माजी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, उपायुक्त सचिन पवार,मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, स्वच्छता आणि घनकचरा विभागाचे अधिकारी, वैद्यकिय अधिकारी, कर्मचारी यांच्यासह स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, नागरिक उपस्थित होते.
आयुक्त गणेश देशमुख म्हणाले, घर, कार्यालये, आजूबाजूचा परिसर ही मलेरिया डेंगूच्या डासांची उत्पत्ती स्थाने असल्याने नागरिकांनी हे डास निर्मुलनासाठी खबरदारी घेऊन स्वतःची जबाबदारी पार पाडावी. महापालिकेची नोकरभरती प्रक्रीयेमध्ये हिवताप अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी, माताबाल संगोपन व विविध रोग नियंत्रणासाठी विशेष डॉक्टरांची तीन पदे निर्माण करुन पुढील दोन महिन्यात ही पदे भरली जातील. या पदांवरील काम कऱणारे वैद्यकीय अधिकारी पालिका क्षेत्रात वारंवार होणार्‍या आरोग्याच्या समस्या रोखण्यासाठी प्रशासकीय विभागाचे काम पाहतील.
जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. भोसले यांनी त्यांच्या निवेदनात मलेरिया निर्मुलनासाठी नागरिकांचा सहभागासोबत जनजागृती आणि अंमलबजावणी केल्यास मलेरियामुक्त क्षेत्र होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. डॉ. भोसले यांनी, घर व कार्यालयात आठ दिवसांपासून अधिक काळ पाणी साचलेला भाग कोरडा करण्याचे आवाहन केले. डॉ.असोशिएशनचे डॉ. गुणे म्हणाले, नागरिकांनी स्वतःच्या घरापासून डासमुक्तीचे लक्ष्य ठेवल्यास डासांची उत्पत्ती रोखता येईल, तसेच लोकशिक्षण, लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगितले. डेंग्यू झाल्यावर पाण्यासोबत मीठाचा अंश असलेले लिंबू सरबत किंवा इलेक्ट्रोल पावडर रुग्णांनी घ्यावी असेही सांगितले.
मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी घरोघरी आरोग्यसेवकांच्या मार्फत साथरोग नियंत्रणाच्या जनजागृतीसाठी दोन लाख पत्रके वाटली गेली असल्याचे सांगून 75 हजार स्टीकर गृहनिर्माण सोसायट्यांच्या इमारतीमध्ये लावल्याचे सांगितले, तसेच पालिका क्षेत्रातील 4980 जणांना किटकजन्य नियंत्रणासाठी नोटीसा बजावल्या असून बांधकाम व्यावसायिक, टायर विक्रेते, रोपवाटिका विक्रेत्यांना या नोटीसा पालिकेने दिल्या असल्याचे सांगितले.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर कॉलेज, टीएनजी कॉलेजचा 100 टक्के निकाल

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी 2024मध्ये घेण्यात …

Leave a Reply