Breaking News

निवडणुकांच्या निकालासाठी उमेदवारांची आंघोळ

कर्जत तहसील व निवडणूक आयोगाच्या नियोजनाचा फटका

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल मंगळवारी (दि. 3) जाहीर करण्यात आले. यासाठी नेहमीप्रमाणे कर्जत तहसील कार्यालयात मतमोजणी करण्यात आली. मात्र तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे निकाल ऐेकण्यासाठी आलेल्या उमेदवारांसह सगळ्यांची कर्जत तहसील कार्यालयात चिंब भिजून दैना झाली.

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला पाऊस व निवडणुकांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर कर्जत तहसील व निवडणूक आयोग यांनी तात्पुरत्या स्वरुपाच्या शेडची व्यवस्था करणे क्रमप्राप्त होते, मात्र चुकीच्या नियोजनाचा फटका उमेदवारांसह सगळ्यांनाच बसला. कर्जत तालुक्यातील नेरळ, उमरोली, वाकस, रजपे व जामरुंग या पाच ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 31 ऑगस्टला मतदान घेण्यात आले होते. या पाचही ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल 3 सप्टेंबर रोजी कर्जत तहसील कार्यालयात  जाहीर करण्याचे नियोजन होते.

त्यासाठी मंगळवारी सकाळीपासून निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यासाठी सुरूवातही करण्यात आली. यावेळी पावसानेही हजेरी लावली. निवडणूक निकालाची प्रक्रिया तहसील कार्यालयाच्या आतल्या भागात सुरु होती. तर उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी हे बाहेर उभे होते. बाहेरची जागा ही नीटशी नसल्याने छत्रीचाही उपयोग होत नव्हता. चिंब भिजत ही निकाल प्रक्रिया पार पडली.  निकालाची टिपण्णी लिहून घेतलेले कागदही भिजले.

काही दिवसांपासून पाऊस सुरु आहे. मात्र पावसाचा अंदाज नव्हता. आमची जबाबदारी असलेल्या मतदान यंत्रांची आम्ही काळजी घेतलेली आहे. त्या भिजणार नाहीत याची योग्य ती दक्षता आम्ही घेतलेली आहे.

-अविनाश कोष्टी, तहसीलदार, कर्जत

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply