Breaking News

नव्या पिढीने कर्मवीरांचा वारसा जपावा -लोकनेते रामशेठ ठाकूर

नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त
पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात शिक्षणाचे कार्य अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सुरू केले. कर्मवीरांना आपल्या कार्यात अनंत अडचणी आल्या, मात्र त्यांनी प्रत्येक अडचणीवर मात केली आणि गोरगरीबांच्या दारापर्यंत शिक्षण पोहचवले. कर्मवीरांचा हा वारसा नव्या पिढीने जपावा, असे आवाहन रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केले. ते वाशी येथील कार्यक्रमात बोलत होते.
पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 136वी जयंती शुक्रवारी (दि. 22) वाशी येथील केबीपी कॉलेज व मॉडर्न स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आली. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे व पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे उपस्थित होते. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते डॉ. रवींद्र कोल्हे यांना कर्मवीर पुरस्कार, तर डॉ. स्मिता कोल्हे यांना लक्ष्मीबाई पाटील पुरस्कार प्रदान करण्यात आला. 25 हजार रुपये, मानपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
कर्मवीर अण्णांना गोरगरीब, आदिवासी मुलांविषयी प्रचंड तळमळ होती. त्या तळमळीतूनच त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. आज ही संस्था जोमाने वाटचाल करीत असल्याचे लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले.
डॉ. रवीद्र कोल्हे यांनी आपल्या मनोगतात रयत शिक्षण संस्था करीत असलेल्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले तसेच कर्मवीरांनी तत्कालीन काळात घेतलेल्या क्रांतिकारक निर्णयाचे त्यांनी स्वागत केले. कर्मवीरांनी केलेल्या शैक्षणिक कार्यामुळेच महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक जडणघडणीला एक वेगळी दिशा मिळाल्याचे ते म्हणाले. डॉ. स्मिता कोल्हे यांनीही आपल्या मनोगतात मेळघाटातील आदिवासी समाजासाठी केलेले कार्य आणि आपला जीवनप्रवास विविध प्रसंगातून उलगडून सांगितला.
या वेळी केबीपी कॉलेजचा आंतरराष्ट्रीय जलतरणपटू अंशुमन झिंगरन याची गिनीज वर्ल्ड बुकमध्ये नोंद झाल्याबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते 25 हजार रुपये, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शुभदा नायक यांनी केले. मानपत्राचे वाचन व सूत्रसंचालन डॉ. आबासाहेब सरवदे व प्रा. माया कळविकट्टे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार मुख्याध्यापिका सुमित्रा भोसले यांनी मानले.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply