Breaking News

महाडच्या गोमुखी आळीतील शतकोत्तर दशकपूर्ती गणेशोत्सव

महाड ः रामप्रहर वृत्त
ऐतिहासिक व सामाजिक क्रांतीचे ठिकाण म्हणून शिवकाळापासून नोंद झालेल्या महाड शहरातील गोमुखी आळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने शतकोत्तर दशकपूर्ती पूर्ण करून 111व्या वर्षात पदार्पण केले आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी स्थापन केलेल्या हिंदू महासभेच्या माध्यमातून महाडमधील सावरकर अनुयायांनी या गणेशोत्सवाची 110 वर्षांपूर्वी स्थापना केली.
शतकपूर्ती करणारे गोमुखी आळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे महाडमधील पहिले, तर रायगड जिल्ह्यातील दुसरे गणेशोत्सव मंडळ आहे. महाडमधील हिंदू महासभेच्या अनुयायांनी लोकमान्य टिळकांचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवूनच सुमारे 110 वर्षांपूर्वी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना करून हा गणेशोत्सव प्रारंभ केला तो आजतागायत अखंडितपणे सुरू आहे. गणेशोत्सवाचे स्वरूप बदलत असताना आपले मंडळ सर्वार्थाने वेगळ्या पद्धतीने समाजाभिमुख राहिल व या गणेशोत्सवाला प्रचलित असलेले बाजारुरूप प्राप्त होणार नाही याची काळजी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व आळीतील नागरिकांनी घेतली आहे.
या मंडळामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये आजची तरुण पिढीही उत्सवाचे पावित्र्य टिकवून ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. मागील दोन-तीन दशकांपासून स्व. पांडुरंग वैद्य यांनी हा गणेशोत्सव अत्यंत साधा पद्धतीने अखंडितपणे सुरू ठेवण्याचे व्रत आपल्या आयुष्यभर जतन केले होते. आळीतील युवकांना एकत्र करून हा हिंदू महासभेच्या माध्यमातून सुरू झालेला गणेशोत्सव खंडित होणार नाही याकडे जातीने लक्ष दिले होते. त्यांचे या गणेशोत्सवासाठीचे योगदान आज या मंडळाच्या 111व्या वर्षीदेखील कार्यकर्त्यांना प्रेरणा देत आहे.
10 वर्षांपूर्वी शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त राज्यभरात विविध शहरातून गेलेल्या गोमुखी आळीतील नागरिकांना एकत्र करून त्यांना पुन्हा एकदा या महोत्सवाकडे वळविण्याचा प्रयत्न तत्कालीन मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी यशस्वीपणे केला होता. यावर्षी गणेशोत्सवाचे 111वे वर्ष असल्याने विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून मंडळामार्फत सातत्यपूर्ण पद्धतीने चालविण्यात येणारा उपक्रम म्हणून नगरपालिका व स्थानिक प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या वर्षभरातील शैक्षणिक उपक्रमाकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्यात येते. प्रतिवर्षी होणार्‍या विविध गुणदर्शन कार्यक्रमांमध्ये तरुण मुलांच्या कलागुणांना जाणीवपूर्वक वाव देण्यात येतो. समाज प्रबोधनाचे महत्त्व सांगणारे पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित करणारे व सणांचे मांगल्य जपणारे देखावे गेल्या अनेक वर्षापासून मंडळाने सादर केले आहेत. या वर्षी गोमुखी आळी सार्वजनिक गणेशोत्सवासाठी ज्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले त्यांची माहिती सांगणारा देखावा साकारण्यात आला आहे.
या वर्षी प्रथम तुला वंदितो धनंजय भाटे व सहकारी यांचा गायन कार्यक्रम, मी आणि डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्यावर आधारित एकपात्री प्रयोग, सावरकर आणि हिंदुत्व या विषयावर व्याख्यान, 111व्या वर्षानिमित्त मंडळाच्या कार्याचे माहिती सांगणारे स्मरणिका प्रकाशन व महिला मंडळाचा सांस्कृतिक कार्यक्रम, पुणे येथील श्री गुरुदत्त भजनी मंडळाचे भजन, प्रतिक पाटणकर रोहा यांचे शिवचरित्रावरील व्याख्यान आदी कार्यक्रमांचे मंडळाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply