Breaking News

विद्यार्थ्यांनी यशाची उत्तुंग भरारी घ्यावी -लोकनेते रामशेठ ठाकूर

गव्हाण विद्यालयात कर्मवीर जयंती साजरी

पनवेल : रामप्रहर वृत्त
साधी राहणी व उच्च विचारसरणी हे तत्व अंगी बाणून विद्यार्थ्यांनी यशाची उत्तुंग भरारी घ्यावी, असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सोमवारी (दि. 25) गव्हाण येथे केले.
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक थोर शिक्षणमहर्षी पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 136व्या जयंतीनिमित्त संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज.आ.भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये कर्मवीर जयंती व थोर देणगीदारांतर्फे गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर अध्यक्षपदावरून बोलत होते.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तत्वांची व विचारांची आपण प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याची आवश्यकता प्रतिपादन केली. अण्णांनी हयातभर घेतलेल्या अपार कष्टामुळे आज संस्थेचा प्रचंड मोठा डोलारा उभा राहू शकला असे सांगताना त्यांनी आपल्या शालेय व महाविद्यालयीन आठवणी सांगून रयत शिक्षण संस्थेच्या कमवा व शिका या योजनेतून आपण घडलो आणि जिद्द, स्वकष्ट व अपार मेहनतीने आज इथपर्यंत आलो, असे सांगितले. तुम्हीही आयुष्यात श्रमाला महत्त्व देऊन जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर उत्तुंग ध्येय सिद्धीसाठी आळस झटकून व लोकांच्या नकारात्मक टीकेचा विचार न करता ध्येयाप्रती एकनिष्ठ राहावे. त्याचप्रमाणे आपले विद्यालय, आपले गाव आपली माणसं यांना कधीही विसरू नये, असे भावनिक आवाहनही त्यांनी केले.
रयत शिक्षण संस्था ही राज्यातील सोळा जिल्ह्यांमध्ये विस्तारली असून लाखो विद्यार्थी संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण घेतात हे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या दूरदृष्टीचे फलित असल्याचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या वेळी नमूद केले.
प्रमुख अतिथी न्हावा शेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजीव धुमाळ यांनी आपल्या प्रमुख भाषणात विद्यार्थ्यांनी उच्च स्वप्न बाळगून त्या स्वप्नांच्या ध्येयपूर्तीसाठी अविश्रांत परिश्रम घेण्याचे सूचित केले. प्रमुख व्याख्याते फुंडे येथील वीर वाजेकर महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.संदीप घोडके यांनीही कर्मवीर अण्णांच्या जीवनातील निवडक प्रसंग सांगून त्यांच्या विचारांनी प्रेरित झालेली पिढी घडावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य वाय.टी.देशमुख यांचेही प्रासंगिक भाषण झाले.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या पारितोषिकसाठी संस्थेकडे 10 लाख रुपये कायम ठेव ठेवल्याबद्दल, वसंतशेठ पाटील यांनी एक लाख रुपयांची कायम ठेव ठेवल्याबद्दल, स्थानिक शाळा समितीचे चेअरमन अरुणशेठ भगत यांनीही 75 हजार कायम ठेव पारितोषिकांसाठी ठेवल्याबद्दल त्याचप्रमाणे दरवर्षी एसएससी परीक्षेतील विज्ञान व गणित विषयातील प्राविण्य संपादन करणार्‍या विद्यार्थ्यांना 10 हजार रुपयांचे बक्षीस ठेवल्याबद्दल जनरल बॉडी सदस्य वाय. टी.देशमुख या सर्व मान्यवरांचे विद्यालयाच्या वतीने ऋणनिर्देश व्यक्त करण्यात आले.
विद्यालयाचे नवनियुक्त प्राचार्य गोवर्धन गोडगे यांनी प्रास्ताविक व अहवाल वाचन केले. उपशिक्षक सागरकुमार रंधवे यांनी सूत्रसंचालन केले, तर संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन अरुणशेठ भगत यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या सोहळ्यास माजी पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य अनंताशेठ ठाकूर व विश्वनाथ कोळी, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष नामदेवशेठ ठाकूर, विद्यालयाचे उपप्राचार्य प्रमोद मंडले, रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व जनरल बॉडी सदस्य रवींद्र भोईर,
मॅनेजिंग कौन्सिल सदस्य ज्योत्स्ना ठाकूर, लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य प्रमोद कोळी, सी.एल.ठाकूर, चंद्रकांत कोळी, युवा नेते किशोर पाटील, जयवंत देशमुख, रघुनाथ देशमुख, राजेंद्र देशमुख, सुधीर ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य योगिता भगत, कमलाकर देशमुख, लाईफ वर्कर अरुण घाग, विभागीय कार्यालयाचे पीआरओ बाळासाहेब कारंडे, इंदुताई घरत, काशिनाथ घरत, अजयशेठ भगत, शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन शरद खारकर, मोरू नारायण म्हात्रे विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन भार्गवशेठ ठाकूर, रयत सेवक संघाचे उपाध्यक्ष नुरा शेख, मोरू नारायण म्हात्रे विद्यालयाच्या प्राचार्य प्रणिता गोळे, ज्युनिअर विभाग प्रमुख बाबुलाल पाटोळे आदींसह पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply