Breaking News

माथाडी कामगार कायद्यात कोणतीही छेडछाड केली जाणार नाही -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी मुंबई :  रामप्रहर वृत्त
माथाडी समाजातील बांधवांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी हे शासन वचनबद्ध आहे. माथाडी कामगारांचे नेते स्व.अण्णासाहेब पाटील यांच्या प्रयत्नांमुळे अस्तित्वात आलेल्या माथाडी कायद्यात कोणत्याही परिस्थितीत छेडछाड केली जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि. 25) येथे दिली.
माथाडी कामगार युनियनच्या वतीने स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या 90व्या जयंतीनिमित्त वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजित माथाडी कामगार मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
या मेळाव्यास स्व.अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार सर्वश्री नरेंद्र पाटील, गणेश नाईक, शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंदा म्हात्रे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, निरंजन डावखरे, शशिकांत शिंदे, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, संघटनेचे अध्यक्ष एकनाथ जाधव, चंद्रकांत पाटील, मिलिंद भोंड, रविकांत पाटील, आनंद पाटील, बाजार समितीचे चेअरमन अशोक डक, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माथाडी समाजाच्या व्यथा समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी माथाडी कामगार मेळाव्याचे व्यासपीठ महत्त्वाचे आहे. माथाडी कामगारांच्या प्रश्नावर शासन गंभीरपणे विचार करीत आहे. माथाडी कामगार कायद्यातील तरतुदी बदलासंबंधीच्या मागणीवरून कामगार विभागाने सुधारणा सुचविल्या होत्या, मात्र त्या वेळी माथाडी नेत्यांनी विरोध केल्यामुळे त्या सुधारणा थांबविल्या. बनावट माथाडींमुळे राज्यातील अनेक उद्योग बाहेर जात आहेत. माथाडी कायद्याचा दुरुपयोग करणार्‍यांना जेरबंद केल्यास आपल्या माथाडी कामगार बांधवांना दोन पैसे जास्तच मिळतील. त्यामुळे माथाडी चळवळीला बदनाम करणार्‍याविरुद्ध कारवाई करण्यासाठी काळानुरूप माथाडी कामगार कायद्यात बदल होणे आवश्यक आहे. ते करताना या कायद्याचा आत्मा बदलणार नाही, असे आश्वासन देऊन उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, माथाडी कायद्याला बदनाम करणार्‍या, त्याचा दुरुपयोग करणार्‍या घटकांना जेरबंद करणार असून त्यासाठी या कायद्यात काळानुरूप काही बदल आवश्यक आहेत, मात्र सुधारणा करताना माथाडी नेत्यांच्या सूचनाही निश्चितच विचारात घेतल्या जातील.
या मेळाव्याच्या निमित्ताने संघटनेचे सरचिटणीस तथा महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी माथाडी कामगारांच्या मागण्या व समस्या मांडल्या. या वेळी माजी मंत्री व आमदार गणेश नाईक, शशिकांत शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. शेवटी या कार्यक्रमाच्या निमित्ताने 18 कामगारांना माथाडी भूषण पुरस्काराने उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते गौरविण्यात आले.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply