Breaking News

आयपीएलची श्रीमंती

सोन्याचे अंड देणारी कोंबडी म्हणून ओळखल्या जाणार्‍या इंडियन प्रीमियर लीगची श्रीमंती पुन्हा एकदा जगभरातील तमाम क्रीडारसिकांना अनुभवयाला मिळाली. आयपीएलचा मेगा ऑक्शन दोन दिवस रंगला आणि त्यात अनेक खेळाडू मालामाल झाले. यंदाच्या या लिलावाचे वैशिष्ट्य म्हणजे फ्रँचायझींनी देशी खेळाडूंना पसंती दर्शविली आहे.

कोरोनाची तिसरी लाट संपण्याच्या मार्गावर असताना सर्वकाही सुरळीत होत जनजीवन पूर्वपदावर आले आहे. मग क्रीडा क्षेत्र तरी त्याला कसे अपवाद ठरू शकते. खेळांच्या स्पर्धा सर्वत्र सुरू असून त्यात खेळाडू आपले कौशल्य, कसब दाखवित आहेत. याआधी शरीरस्वास्थ्य आणि तंदुरुस्ती एवढ्यापुरते मर्यादित असलेल्या खेळात करिअरही होत असल्याचे एव्हाना स्पष्ट झाल्याने त्याकडे तरुणाईचा ओढा कमालीचा वाढला आहे. क्रिकेट हा धर्म मानल्या जाणार्‍या भारतात या खेळाला विशेष महत्त्व आहे. कालपरत्वे इतरही खेळ व खेळाडूंना चांगले दिवस आल्याचे चित्र देशात पहावयास मिळते. याचे श्रेयही क्रिकेट विशेषत: आयपीएलला द्यावे लागेल. आपल्याच देशात नव्हे; तर जगभरातील विविध देशांमध्ये निरनिराळ्या खेळांच्या लीग खेळल्या जात आहेत. इतकी आयपीएल लोकप्रिय झाली असून तिची क्रेझ आजही कायम आहे. गेल्या वेळी कोरोना महामारीच्या काळात ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवली गेली होती. यंदा कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्याने ही स्पर्धा भारतातच खेळवली जाणार आहे. त्यासाठी शनिवार व रविवार असे दोन दिवस बंगळुरूत लिलाव प्रक्रिया झाली. या मेगा ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्स, राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाइट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स हे मूळचे आठ आणि लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे दोन नवे अशा एकूण 10 संघमालकांनी सहभाग नोंदवित खेळाडूंवर बोली लावली. आयपीएल ही उगवत्या तार्‍यांची स्पर्धा मानली जाते. इथे फ्रेंचायझी चमकदार कामगिरी करणार्‍या ताज्या दमाच्या खेळाडूंना प्राधान्य देतात. सध्या भारतीय संघाची कामगिरी नफीतुली असली तरी अलीकडच्या काळात देशाच्या विविध भागांतून आलेल्या युवा खेळाडूंनी स्थानिक, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपली छाप पाडली आहे. त्यामुळे राष्ट्रीय संघात कुणाची निवड करायची आणि कुणाला बाहेर बसवायचे असा प्रश्न निवड समिती तसेच कर्णधाराला पडत असतो. आयपीएलच्या लिलाव प्रक्रियेतही अशीच चुरस दिसून आली. पहिल्याच दिवशी इशान किशन, दीपक चहर, श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर व हर्षल पटेल या भारतीय उदयोन्मुख खेळाडूंना दहा कोटींच्या वर बोली लागली. यात इशानला सर्वाधिक म्हणजे 15.25 कोटी रुपये मोजून मुंबई इंडियन्स संघाने आपल्याकडे कायम ठेवले. याशिवाय चहर (चेन्नई सुपर किंग्ज) 14 कोटी रुपये, अय्यर (कोलकाता नाईट रायर्डस) 12.25 कोटी, ठाकूर (दिल्ली कॅपिटल्स) आणि पटेल (रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू) प्रत्येकी 10.75 कोटी दुसर्‍या दिवशीही काही खेळाडूंनी ‘भाव खाल्ला’. एकूणच आयपीएलमध्ये खेळाडूंची कोटीच्या कोटी उड्डाणे पहायला मिळाली, तर काही दिग्गज व अनुभवी खेळाडूंना खराब फॉर्ममुळे कुणीही स्वीकारले नाही. त्यांनी वाईट वाटून घेण्याची गरज नाही, कारण या खेळाडूंनी यापूर्वीच्या पर्वांमध्ये चांगली रक्कम घेऊन ही स्पर्धा गाजवलेली आहे. जगातील सर्वांत श्रीमंत क्रिकेट मंडळ असलेल्या बीसीसीआयची आयपीएल स्पर्धा त्याच दिमाखदार रूपात होत आहे. या स्पर्धेत नावापेक्षा फॉर्म महत्त्वाचा आहे.

Check Also

सीकेटी विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त दिंडी

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन …

Leave a Reply