Breaking News

रायगडात अन्न व औषध प्रशासनाचे धाडसत्र

26 लाख 81 हजारांच्या माल जप्त; परवाना रद्दचीही कारवाई

पेण ः प्रतिनिधी
गणेशोत्सवादरम्यान सर्व पदार्थ विक्रेत्यांची बैठक घेऊन त्यांना सणासुदीच्या दिवसात ताजे, स्वच्छ तसेच भेसळ नसलेले पदार्थ विक्रीस ठेवण्याच्या सूचना अन्न व औषध प्रशासनामार्फत देण्यात आल्या आहेत, मात्र तरीदेखील काही विक्रेते नियमांचे उल्लंघन करीत आहेत. त्यामुळे अन्नपदार्थ तपासण्या मोहीम सुरू करून परवाना निलंबनाची कारवाई करण्यात येत असल्याचे रायगड जिल्हा अन्न व औषध प्रशासन पदावधित अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त नितीन मोहिते यांनी सांगितले. पेण येथील कार्यालयामार्फत जुलै ते सप्टेंबर या कालावधीत पावसाळी मोहीम घेण्यात आली, तसेच हॉटेल व रेस्टॉरंट मोहीम, दुध व दुग्धजन्य पदार्थाबाबत मोहीम घेण्यात आल्या आहेत, तर सणासुदीच्या मोहिमेत रायगड जिल्ह्यात 139 ठिकाणी तपासण्या करून 100 अन्नपदार्थांचे नमुने जप्त करण्यात आले आहेत. यात वनस्पती तेल, पनीर व मोदक असे एकूण 10747.8 किलो पदार्थ तसेच क्रीम मिल्क सहा किलो असा एकूण 26 लाख 81 हजार 156 रुपयांच्या मालावर जप्त करण्यात आला असून यात एका पेढीविरुद्ध परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पेण येथील अन्न व औषध प्रशासन कार्यालयात अधिकार्‍यांच्या 12 पदांपैकी तीनच अधिकारी आपली सेवा बजावत आहेत. बाकी पदे अद्याप रिक्तच असल्याने कारवाई करण्यासाठी मनुष्यबळ कमी पडत आहे. तसे असले तरी वेळोवेळी मोहीम घेऊन तपासण्या व कारवाई करण्यात येत आहे. जिल्ह्यातील पदार्थ विक्रेते यांनी नियमाप्रमाणे अन्नपदार्थांची विक्री करावी तसेच ग्राहकांनीसुद्धा मान्यताप्राप्त दुकानातून अन्न पदार्थ खरेदी करावे जर गैरप्रकार दिसून आल्यास अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त नितीन मोहिते यांनी केले.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर कॉलेज, टीएनजी कॉलेजचा 100 टक्के निकाल

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी 2024मध्ये घेण्यात …

Leave a Reply