Breaking News

स्वच्छ हवा दुरापास्त

गेली काही वर्षे ऑक्टोबर ते जानेवारी या काळात देशातील नवी दिल्ली, मुंबई व कोलकाता या शहरांमधील हवेच्या दर्जाने अतिधोकादायक पातळी गाठणे नित्याचे झाले आहे. परिस्थिती बिकट होताच तातडीची उपाययोजना अवश्य केली जाते, परंतु अशी परिस्थिती ओढवूच नये या दिशेने मात्र फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. यापैकी वाहनप्रदूषणाच्या विरोधातील उपाययोजना जनतेच्या सहकार्याशिवाय शक्य नाही.

हवेच्या प्रदूषणामुळे नवी दिल्लीतील लोकांचे आयुष्य काही वर्षांनी कमी होत असल्याचा अहवाल दोनएक वर्षांपूर्वी आला होता. राजधानीतील अनेक लहान मुलांना दम्याचा विकार असल्याचेही दिसले होते. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईही या अशा परिस्थितीपासून आता फार दूर दिसत नाही. वाढलेली चारचाकी व दुचाकी वाहने, सततची बांधकामे, जीवाश्म इंधनांचे ज्वलन व पावसाळ्याच्या अखेरीस साचून राहणारी धूळ आपल्या सगळ्यांचाच श्वास कोंडते आहे. गेले दोन दिवस सकाळी आणि संध्याकाळी मुंबई, नवी मुंबई, उरण परिसरातील अनेक भागांमध्ये दूरवरचे काही दिसत नाही. अवघा परिसर धुक्यात गुरफटून गेल्यासारखा दिसतो. प्रत्यक्षात मात्र हे धुके नसून हवेत साचलेले धुलीकण आणि धुके यांच्यामुळे धुरके पसरते आहे. मंगळवारपासून मुंबई व आसपासच्या परिसरातील हवेचा दर्जा घसरला असून प्रदूषणामुळे ठाणे, नवी मुंबईसह संपूर्ण परिसराचा श्वास कोंडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. साध्या डोळ्यांनीही लोकांना हवेतील हा बदल दिसतो आहे. पावसाळा संपला तरी वातावरणातील आर्द्रता कायम असल्याने हवेतील प्रदूषके साचून राहतात. सर्वसाधारणपणे दिवाळीच्या महिनाभर आधीपासूनच श्वसनाचे विकार असणार्‍यांना डॉक्टर विशेष काळजी घेण्याचा सल्ला देतात. यंदा तर मुंबई व आसपासच्या परिसरातील सगळ्यांनाच पालिकेने मास्क वापरण्याची सूचना केली आहे. हवेचा दर्जा वाईट असल्यामुळे सर्दी, खोकला व श्वसनाचे विकार बळावताना दिसत आहेत. गेल्या दोन दिवसांत मुंबईतील हवेच्या दर्जाचा निर्देशांक दिल्लीपेक्षाही खाली घसरल्याचे स्पष्ट झाले आहे. एकीकडे ऑक्टोबर हीटमुळे लोक त्रस्त असतानाच मुंबईतील अनेक भागांमधील हवा अतिवाईट असल्याची नोंद बुधवारी सलग तिसर्‍या दिवशी करण्यात आली. मुंबईतील पश्चिम उपनगरांपासून नवी मुंबई, उरणपर्यंत काही भागांमध्ये संध्याकाळी हवा अतिधोकादायक असल्याचे दिसले. सकाळी साडेपाच ते नऊ या वेळेत वासिंद-टिटवाळा तसेच कर्जत-बदलापूर भागात रेल्वेमार्गावरील धुरक्यामुळे समोरचे नीट दिसत नसल्याने रेल्वेगाड्याही पंधरा मिनिटे विलंबाने धावत होत्या. हवेचा दर्जा वाईट असल्याने विषाणूजन्य आजार पसरण्याचीही भीती आहे. स्मॉगगनचा वापर करून पाणी फवारले असता धुलीकण जमिनीवर बसतात, परंतु मुंबई महापालिकेकडे अशी आणखी 30 यंत्रे यायला दोन-अडीच महिने लागण्याची शक्यता असून तोपर्यंत हा त्रास सहन करण्यावाचून पर्याय दिसत नाही. नवी मुंबई पालिकेकडूनही धुलिकण रोखण्यासाठी पाण्याचे तुषार उडवणार्‍या गाड्या फिरवल्या जात असल्याचे समजते. हवेचा दर्जा असा खालावण्यामागे बांधकामांमुळे होणारे प्रदूषण असू शकते. त्यामुळे बांधकामामुळे निर्माण होणारी धूळ रोखण्यासाठी पालिकेकडून विकासकांना खबरदारीच्या नोटिसा पाठवण्यात येणार आहेत. अर्थात त्या कितपत परिणामकारक ठरतील हा प्रश्नच आहे. एकीकडे बांधकामांचे प्रमाण प्रचंड वाढलेले असताना त्यात वाहनांच्या प्रदूषणामुळे भरच पडते. हवेच्या दर्जाविषयक एका वेबसाइटवरील माहितीनुसार बुधवारी जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये मुंबईचा क्रमांक पहिल्या दहामध्ये होता म्हणजे स्थिती निश्चितच चिंता वाढवणारी आहे.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply